... म्हणून राफेल संदर्भातील निकाल मोदींसाठी महत्त्वाचा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल खरेदी व्यवहारावरून सातत्याने टीका करीत होते.

Updated: Dec 14, 2018, 11:39 AM IST
... म्हणून राफेल संदर्भातील निकाल मोदींसाठी महत्त्वाचा title=

नवी दिल्ली - राफेल प्रकरणी सु्प्रीम कोर्टाने दिलेला निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या व्यवहाराची कोर्टाच्या नियंत्रणाखालील एसआयटीकडून चौकशी करण्याची गरज नाही, असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिला. गेल्या काही महिन्यांपासून विरोधक आणि विशेषतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल खरेदी व्यवहारावरून टीका करीत होते. पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांनी प्रचारसभांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे त्यातील हवाच निघून गेली आहे.

लोकसभा निवडणुका जवळ
येत्या मे २०१९ मध्ये देशात लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. त्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नरेंद्र मोदी या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येणार का, हाच मुद्दा पुढील काही महिने देशभरात चर्चेचा मुद्दा असणार आहे. राहुल गांधी यांनी सातत्याने राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करून मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली होती. अनिल अंबानी यांच्या रिलायन्सकडे या विमानाचे कंत्राट देण्यावरही त्यांनी जाहीर सभांमध्ये टीका केली होती. केवळ मैत्रीसाठीच नरेंद्र मोदी यांनी विमानांचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीकडे राफेलचे काम दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर या प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असता, तर त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत हाच मुद्दा राहुल गांधी यांना वापरता आला असता. पण आता चौकशीची गरज नाही म्हटल्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपांना अर्थच राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते याचा परिणामकारक वापर करू शकणार नाहीत.

पाच वर्षांत गैरव्यवहार नाही
गेल्या साडेचार वर्षांत मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने एकही गैरव्यवहार केलेला नाही, असा दावा त्यांचे मंत्री आणि भाजपचे नेते करीत आहेत. जर राफेल प्रकरणात एसआयटी स्थापन केली गेली असती, तर त्याचा डाग मोदी सरकारवर पडला असता आणि एकही गैरव्यवहार केला नाही, याचा त्यांना उघडपणे प्रचार करता आला नसता. एसआयटीची चौकशी पूर्ण होईपर्यंत सरकारला शांतच राहावे लागले असते.

पाच राज्यांतील पराभवानंतर आलेला निकाल
याच आठवड्यात देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आले. या पाचही राज्यात भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नाही. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यात भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. तिन्ही ठिकाणी काँग्रेसची सत्ता येणार आहे. तर तेलंगणामध्ये भाजपला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. नरेंद्र मोदी यांनी या पाचही राज्यात भाजपचा प्रचार केला होता. पण तरीही पक्षाला यश मिळाले नाही. दुसरीकडे गेल्या अनेक निवडणुकीत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत मतदारांनी संधी दिली आहे. यामुळे भाजपच्या गोटात काहीसे निराशेचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आह

मोदींना लक्ष्य
राफेलचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट होती, असे राजकीय अभ्यासक सांगतात. पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यातच राहुल गांधी आणि अन्य विरोधकांनी सातत्याने नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राग आहे. राफेल प्रकरणातील कोर्टाच्या निकालामुळे हा मुद्दा विरोधकांच्या हातातून गेला आहे. यावरून ते मोदींवर टीका करू शकणार नाही.  तर सरकारच्या व्यवहारावर सुप्रीम कोर्टाने कोणतीही शंका उपस्थित न केल्यामुळे मोदी या व्यवहारावर निवडणूक प्रचारात खुलेपणाने बोलू शकतात.