जवानांनी वारंवार प्राणांची आहुती का द्यायची; सिद्धुंचा भाजपला सवाल

कंदहार घटनेच्यावेळी दहशतवाद्यांना कोणी सोडले?

Updated: Feb 18, 2019, 03:28 PM IST
जवानांनी वारंवार प्राणांची आहुती का द्यायची; सिद्धुंचा भाजपला सवाल title=

नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांनी सामोपचाराच्या माध्यमातून तोडगा काढावा, असे वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यामुळे सिद्धू यांना सोनी वाहिनीवरील 'द कपिल शर्मा शो'च्या निर्मात्यांनी घरचा रस्ताही दाखवला होता. एकूणच सिद्धू यांना आपल्या वक्तव्यामुळे प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र, या सगळ्यानंतरही आपण स्वत:च्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सिद्धू यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. दहशतवाद कदापि खपवून घेता येणार नाही. यामुळे देशातील आगामी पिढ्यांमध्ये संशयाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे दहशतवादासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे सिद्धू यांनी म्हटले. 

'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी

मात्र, मला विचारायचे आहे की, कंदहार घटनेच्यावेळी दहशतवाद्यांना कोणी सोडले? त्यासाठी कोण जबाबदार आहे? आपली लढाई त्या लोकांविरुद्ध आहे. यासाठी जवानांनी प्राणांची आहुती का द्यायची? या सगळ्यावर ठोस तोडगा का काढला जात नाही, असा सवालही सिद्धू यांनी विचारला.