बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेला गोळीबार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीने घेतली आहे. मात्र यानंतरही मुंबई पोलीस लॉरेन्स बिष्णोईचा ताबा मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या जेलमध्ये असून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) त्याचा ताबा मिळालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये सलमान खानच्या घऱाबाहेर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी साबरमती जेलमध्ये (Sabarmati Jail) असणाऱ्या बिष्णोईचा ताबा मिळवण्यासाठी अनेक अर्ज दाखल केले. मात्र हे सर्व अर्ज फेटाळण्यात आले. गृहमंत्रालयाने बिष्णोईचं प्रत्यार्पण करण्यापासून रोखलं असल्याने हे अर्ज फेटाळत नकार देण्यात आला.
लॉरेन्स बिष्णोईला ऑगस्ट 2023 मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दिल्लीच्या तिहार जेलमधून साबरमती जेलमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी गृहमंत्रालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 268 अन्वये आदेश जारी केला होता. त्यानुसार, कोणतंही राज्य किंवा यंत्रणा एका वर्षांसाठी त्याच्या कोठडीची मागणी करू शकत नाही. हे कलम सरकारला कैद्यांच्या हालचालींवर बंदी घालण्याचा अधिकार देतं. जेव्हा असं केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
हा आदेश यावर्षी ऑगस्टपर्यंत लागू होणार होता, मात्र तो आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बिष्णोई टोली चर्चेत आली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी त्यांनी घेतली होती. या टोळीच्या दैनंदिन कारवाया बिष्णोईचा भाऊ अनमोल आणि गुंड गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा चालवता. या टोळीने काळविटाच्या शिकारीत सहभागी असल्याने सलमान खानला ठार मारणार असल्याचं म्हटलं आहे. सलमान खानने 1998 मध्ये काळविटाची शिकार केली होती. बिष्णोई समाजात काळवीटला पवित्र मानलं जातं.
लॉरेन्स बिष्णोईने 2018 मध्ये कोर्टात हजर केलं असता सांगितलं होतं की, "आम्ही जोधपूरमध्ये सलमान खानला ठार करणार आहोत. आम्ही कारवाई केल्यावर सर्वांना कळेल. मी आतापर्यंत काहीही केलेले नाही. माझ्यावर विनाकारण गुन्ह्यांचे आरोप होत आहेत". या टोळीतील एका सदस्याने सिद्दींकीच्या हत्येतही त्याचाच हात असल्याचं म्हटलं आहे.
लोणकरने दावा केला की सिद्दीकींचा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याने, तसंच सलमान खानच्या जवळचा असल्याने ठार करण्यात आलं. सलमान खनच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एक अनुज थापन याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे त्यचा बदला घेत असल्याचाही दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पोलीस याची वैधता तपासत आहेत.