जेटलींच्या जागी कोण होणार अर्थमंत्री ? 'या' नावाची चर्चा

 अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर नाही.

Updated: May 29, 2019, 02:54 PM IST
जेटलींच्या जागी कोण होणार अर्थमंत्री ? 'या' नावाची चर्चा title=

नवी दिल्ली : देशात ३० मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. मोदी सरकार-२ मध्ये कोणत्या नेत्याला कोणते मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. परंतु या आधी मोदींपुढे एक मोठा पेच निर्माण झाला आहे. अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर नाही. त्यामुळे मला मंत्रीपद देऊ नये अशी मागणी करणारं पत्र त्यांनी मोदींना लिहिलं आहे. त्यामुळे आता अर्थमंत्रीपदा सारख्या महत्त्वाच्या विभागाची सूत्र कोणाकडे द्यायची हा मोठा प्रश्न मोदींपुढे उभा ठाकला आहे.

जेटलींनी मंत्रीपद न देण्याची मागणी केल्यानंतर आता अर्थमंत्रीपदासाठी अमित शाह यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. झी बिझनेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शहा हे देशाचे नवे अर्थमंत्री होऊ शकतात. अमित शाह हे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत गांधीनगर मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

अरुण जेटली यांनी मोदींच्या पहिल्या मंत्रीमंडळात अर्थमंत्रीपदाची धुरा सक्षमपणे सांभळली होती. पंरतु कॅन्सरचे निदान झाल्याने त्यांनी यंदा आपल्याला मोठी जबाबदारी न देण्याची मागणी केली आहे. याआधी जानेवारीमध्ये जेटली यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते अर्थसंकल्प देखील सादर करु शकले नव्हते. त्यांच्या ऐवजी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी काही कार्यकाळासाठी पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आली होती.

३० मे रोजी होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमाला देश-विदेशातील दिग्गज नेते, तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे उद्या कोणत्या नेत्याला कोणत्या खात्याची धुरा मिळते आणि महाराष्ट्राच्या पदरी किती मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.