Revanth Reddy New CM of Telangana : तेलंगाणा राज्य स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदात काँग्रेसने बहुमत मिळवत सत्ता काबिज केली आहे. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा काँग्रेस पक्षाने केली आहे. तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 7 डिसेंबरला होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तेलंगणा विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून रेवंत रेड्डी यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे.
Congress President Shri @kharge has decided to go with Revanth Reddy as the new CLP of the Telangana Legislative Party.
The Congress will deliver a clean and able government that will provide maximum governance.
: Shri @kcvenugopalmp, General Secretary (Organisation) pic.twitter.com/njFUduUFsb
— Congress (@INCIndia) December 5, 2023
रेवंत रेड्डी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी अविभाजित आंध्र प्रदेशातील कोंडारेड्डी पल्ली, नगरकुर्नूल येथे झाला. रेवंत यांच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिंह रेड्डी आणि आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा आहे. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाच्या ए.व्ही. कॉलेजमधून शिक्षण घेतले. ते ललित कला शाखेत पदवीधर आहेत. उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेतलेले रेड्डी त्यावेळी अभाविपशी संबंधित होते.
रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची अनुमुला गीताशी लग्न केलं. त्यानंतर राजकीय आयुष्याला नवं वळण मिळाल्याचं दिसून आलंय. 2007 मध्ये रेवंत रेड्डी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यामुळे त्यांचं राजकारणात चांगलंच वजन वाढलं होतं. त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. TDP उमेदवार म्हणून त्यांनी 2009 मध्ये आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. 2014 मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले.
टीडीपीनंतर त्यांच्या राजकीय आयुष्याला कलाटणी मिळाली. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 ची तेलंगणा विधानसभा निवडणूक कोडंगलमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढली. मात्र, त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं. त्यानंतर त्यांनी खासदारकीवर डाव खेळला अन् 2019 मध्ये लोकसभेत पोहोचले. याच काळात त्यांनी हाय कमांडशी चांगले संबंध प्रस्तापित केले. अल्पकालावधीत त्यांनी प्रदेशाध्यक्षपद मिळवलं अन् काँग्रेसची कायशैली बदलली. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरोधात तिकीट दिलं अन् प्रमुख नेता म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. अशातच आता मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.