Bageshwar Dham Baba Controversy: धीरेंद्र कृष्ण शास्त्री नेमके कोण आहेत? अंधश्रद्धेवरुन त्यांना अंनिसने काय आव्हान दिलं आहे?

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एका कार्यक्रमात जाहीर आव्हान दिल्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तेथून पळ काढल्याचा दावा आहे  

Updated: Jan 20, 2023, 01:19 PM IST
Bageshwar Dham Baba Controversy: धीरेंद्र कृष्ण शास्त्री नेमके कोण आहेत? अंधश्रद्धेवरुन त्यांना अंनिसने काय आव्हान दिलं आहे? title=
अंनिसने दिलेल्या आव्हानामुळे बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत

Who is Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) सध्या चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) जाहीर आव्हान दिल्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तेथून पळ काढल्याचा दावा आहे. अंनिसने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवा असं जाहीर आव्हान दिलं होतं. 

नेमका वाद काय?

नागपूरमधील रामकथा कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपस्थित होते. यावेळी अंनिसचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जाहीर आव्हान दिलं. हा सगळा प्रकार त्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री कार्यक्रम अर्ध्यातच सोडून निघून गेले. यामुळे त्यांच्याकडे खरंच काही दैवीशक्ती आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला कट असल्याचा दावा

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हा सगळा प्रकार कट असल्याचा दावा केला असून रायपूरमध्ये 20321 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात अंनिसने हजर राहावं असं प्रतीआव्हान दिलं आहे. "याआधी मी सात दिवसांसाठी सभा भरवली होती, तेव्हा तुम्ही आला नाहीत. जर मला संधी मिळाली तर मी परत येईन. पण सध्या मी तुमचं आव्हान स्वीकारत आहे. तुम्ही 20-21 दरम्यान रायपूरमध्ये येऊ शकता. मी तिथे कार्यक्रम घेणार आहे. मी तुमच्या तिकीटाचेही पैसे देईन", असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले आहेत.

आपण १६० कुटुंबांची घरवापसी केली असल्याने हा वाद होणार याची आपल्याल कल्पना होती असा दावाही त्यांनी केला आहे. "या कुटुंबांनी धर्मवापसी आणि घरवापसी केली असून करोडो खर्च करत आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी जर ते करोडो खर्च करत असतील आणि त्यातील १० कोटी आम्हाला दिले तर त्यात चुकीचं काय?", अशी विचारणाही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केली आहे.

अशा वादाकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचं सांगताना त्यांनी घराच्या मागे कुत्रे भुंकत असतात असं विधान केलं आहे. तसंच आपल्याला आव्हान देणाऱ्यांनी कोर्टात यावं असंही म्हटलं आहे. 

अंनिसची पोलीस कारवाईची मागणी

दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर धामचे महाराज अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात पोलीस कारवाई केली जावी अशी मागणी अंनिसने केली आहे. 

कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री?

बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम मंदिराशी जोडलेले आहेत. त्यांचे देशभरात हजारो भक्त आहेत. छत्तरपूरमधील गाडा गावात त्यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत असते. असं सांगितलं जातं की, धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आजोबा निर्मोही आखाडाशी जोडलेले होते.