कोरोनाचा प्रसार हवेतूनही होतो? WHOने दिलं हे उत्तर

जगभरात 1 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे

Updated: Jul 8, 2020, 06:21 PM IST
कोरोनाचा प्रसार हवेतूनही होतो? WHOने दिलं हे उत्तर title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल हेड Maria Van Kerkhove यांनी कोरोना व्हायरस हवेत राहण्याची आणि हवेमध्ये पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं म्हटलं आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी किंवा व्हेंटिलेशन कमी असलेल्या ठिकाणी अधिक धोका असू शकतो, असं त्या म्हणाल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं की, याबाबत तज्ञांचा सल्ला घेतला जाईल आणि त्यानुसार नवीन मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली जाऊ शकतात. तज्ञांचं असं मत आहे की, जरी कोरोना व्हायरस हवेतून पसरत असला तरीही मास्क लावणं आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. परंतु सध्या १ मीटर ठेवण्यात आलेलं सुरक्षित अंतर आणखी वाढवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

३२ देशांतील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेला एक मुक्त पत्र लिहून कोरोना व्हायरस हवेतील बारीक कणांद्वारे देखील पसरतो, असं सांगितलं होतं. रुग्णाने शिंकताना, खोकताना काळजी न घेतल्यास कोरोनाची लागण दुसऱ्या व्यक्तीलाही होऊ शकते. मात्र आता कोरोना व्हायरस हवेमध्ये देखील असू शकतो असं बोललं जात असल्याने लोकांना अधिक काळजीसह सतर्क राहावं लागणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांनुसार, जगभरात १ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५ लाख ३५ हजार लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.