चांद्रयान-3 चा सॉफ्ट लॅण्डींगच्या वेळेस वेग किती असेल? जाणून घ्या कसं कंट्रोल केलं जातंय यान

Chandrayaan-3 Speed At Soft Landing: सध्या चांद्रयान-3 चं रोव्हर हे चंद्राच्या कक्षेत फिरत असून त्याचा वेग 6000 किलोमीटर प्रति तास इतका आहे. चांद्रयान-3 च्या लॅण्डरचं चंद्राच्या भूपृष्ठावर 23 ऑगस्ट रोजी लॅण्डींग होणार आहे. मात्र लॅण्डींगच्या वेळी या यानाचा वेग किती असेल याची माहिती समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 11, 2023, 08:19 AM IST
चांद्रयान-3 चा सॉफ्ट लॅण्डींगच्या वेळेस वेग किती असेल? जाणून घ्या कसं कंट्रोल केलं जातंय यान title=
चांद्रयान-3 च्या लॅण्डरचं चंद्राच्या भूपृष्ठावर 23 ऑगस्ट रोजी लॅण्डींग होणार

Chandrayaan-3 Speed At Soft Landing: भारताच्या चांद्रयान मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पुढील काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. चांद्रयान-3 लवकरच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लॅण्डींगची तयारी सुरु झाली आहे. हा टप्पा फार महत्त्वाचा मानला जात आहे. कारण चांद्रयान-2 मोहीम याच टप्प्यामध्ये अपयशी ठरली होती. दुसऱ्यांदा तशीच चूक करणं भारतीय आकाश संशोधन संस्थेला म्हणजेच 'इस्रो'ला परवडणारं नाही. संशोधनांनी दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-2 मिशनमधील आधीचे सर्व टप्पे सुरळीतपणे पार पडले होते. मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आली आणि चांद्रयान-2 मधून रोव्हर बाहेर पडलं नव्हतं. 

लॅण्डींगच्या वेळी किती असणार वेग?

'इस्रो'च्या संशोधकांना चांद्रयान-2 च्या अपयशानंतर अनेक धडे मिळाले. यावेळेस चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लॅण्डींगला याच धड्यांमधून शिकून लॅण्डींग यशस्वी करण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या संशोधनादरम्यान हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना वेग किती असावा यासंदर्भातील सखोल संशोधन करण्यात आलं आहे. याच संशोधनाच्या आधारावर आता चांद्रयान-3 चं लॅण्डींग 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. चांद्रयान-3 मोहीम अवकाशात झेपावली तेव्हा त्याचा वेग 36 हजार किलोमीटर प्रति तास इतका होता. आता चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या चांद्रयान-3 च्या ऑर्बिटरचा वेग ताशी 6000 किलोमीटर प्रति तास इतका आहे. हा वेग हळूहळू कमी केला जाणार आहे. प्रत्यक्ष लॅण्डींगच्या वेळी या यानाचा वेग 10.8 किलोमीटर प्रति तास इतका असेल.

चांद्रयान-2 मध्ये याच गोष्टीत झालेली गडबड

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार लॅण्डींगच्या वेळेस यानाचा ब्रेक कमी थ्रस्ट पद्धतीचा वापर केला जाईल. यामध्ये वेगात असणाऱ्या यानाची दिशा हळूहळू बदलून त्याला निश्चित वेगापर्यंत आणलं जातं. चांद्रयान-2 मोहिमेमध्ये याच प्रक्रियेत गोंधळ झाला होता आणि ती मोहिम अपयशी ठरलेली. चांद्रयान-2 मध्येही थ्रस्टचा वापर केला मात्र त्यामुळे गडबड झाली आणि लॅण्डर यानामधून बाहेरच आलं नाही. त्यामुळेच आता या अॅडजेस्टेबल थ्रस्टबद्दल संशोधकांनी बराच अभ्यास केला आहे. म्हणूनच आता चंद्रायन-3 चा वेग कमी करण्यासाठी थ्रस्टचाच वापर केला जाणार आहे. हे यान पृथ्वीवरुन रडारच्या माध्यमातून नियंत्रित केलं जात आहे. थ्रस्ट किती असावा तो कधी आणि कसा वापरावा यासंदर्भात इस्रोच्या संशोधकांनी सखोल अभ्यास केला असून याचा प्रत्यक्ष उपयोग 23 ऑगस्ट रोजी लॅण्डींगच्या वेळी केला जाणार आहे.