ममता बॅनर्जींचा ईव्हीएमवरून उठला विश्वास, बॅलेट पेपरची मागणी

 ईव्हीएमच्या तपासासाठी एक समिती बसवली जावी अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

Updated: Jun 3, 2019, 07:14 PM IST
ममता बॅनर्जींचा ईव्हीएमवरून उठला विश्वास, बॅलेट पेपरची मागणी title=

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुन्हा एकदा निवडणूक निकालावर भाष्य केले आहे. भारतीय जनता पार्टी ही बंगालच्या बाबतीत भ्रामक आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. याच्याशी लढा देण्यासाठी तृणमुल कॉंग्रेस डोअर टू डोअर कॅम्पेन चालवणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी ममता यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले. आम्हाला ईव्हीएम नकोय. निवडणूक पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर व्हायला हवी. ईव्हीएमच्या तपासासाठी एक समिती बसवली जावी अशी मागणीही त्यांनी केली. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबत सोमवारी एक बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या प्रदर्शनाबद्दल या बैठकीत चर्चा झाली. तसेच टीएमसीच्या कमजोर प्रदर्शनाची समीक्षा देखील करण्यात आली. जय श्रीराम बद्दल मला जाणिवपुर्वक भडकवले जात आहे. असे करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना उधाण आले आहे. माझा राग अधिकाधिक वाढवण्यासाठी रोज नवे प्रयत्न केले जात असल्याचे त्या म्हणाल्या. 

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने यंदा चांगलं यश मिळवलं आहे. यानंतर मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय आणि तृणमूल काँग्रेसचे २ आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह हे आज भाजपचं कमळ हातात घेणार आहेत. दिल्लीत संध्याकाळी ४ वाजता भाजपच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या भागातील जवळपास ५० नगरसेवकांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सर्व नगरसेवक कंचरापारा, हलिशहर आणि नैहाती नगरपालिकेचे आहेत. सोबतच भाजपची भाटपारा नगरपालिकेवर सत्ता येणार आहे. भाजपचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह भाटपारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत.