मुंबई : Weather update : नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरु असतानाच देशात सध्या पाऊस (Monsoon News) आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली आहे. (heat wave) तर पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पावसाने जोर धरला आहे.
उत्तर भारतासह विदर्भातील उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. उत्तरेकडून कोरडे आणि उष्ण वा-यांचे प्रवाह तीव्र झाल्यामुळे उत्तर आणि मध्य भारतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे.
तर महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये 46 अंश सेल्सिअसच्या पुढे आणि देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या काही भागात तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तीव्र झाला. अशा स्थितीत आता पावसामुळे मिळणाऱ्या थंडाव्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
तर कोकणात वातावरण ढगाळ आहे. काही ठिकाणी तुरळ पाऊस झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी हवेत गारवा आहे. मात्र, दुपारच्यावेळी अनेक ठिकाणी उष्णतेचे चटके बसत आहेत. त्यामुळे पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण पाहायला मिळत आहे.