पत्नीची काळजी न घेणारे देशवासियांचा सांभाळ काय करणार?- ममता बॅनर्जी

आरोप प्रत्यारोपांचं सत्र पुन्हा पेटलं 

Updated: May 7, 2019, 07:41 AM IST
पत्नीची काळजी न घेणारे देशवासियांचा सांभाळ काय करणार?- ममता बॅनर्जी  title=

बिलासपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेकदा आवाज उठवणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या एकंदर नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत त्यांनी बिलासपूर येथे लक्षवेधी वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या खासगी आयुष्यावर निशाणा साधत ते देशवासियांची काळजी कशी घेणार, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. 

बिलासपूर येथे केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय विश्वात मोदी विरुद्ध बॅनर्जी हे युद्ध पुन्हा एकदा पेटलं. परिणामी आरोप प्रत्यारोपांनाही उधाण आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 'डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही जनतेच्या रक्ताने माखले आहात', असं म्हणत पत्नीविषयी विचारलं असता, त्या काय करतात?, कुठे राहतात?, याविषयी विचारलं असता मला ठाऊक नाही, हे उत्तर पंतप्रधान देतात असं म्हणत बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या कौटुंबीक मुद्द्यांकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं. 'जे स्वत:च्या पत्नीची काळजी घेऊ शकले नाहीत, त्यांना सांभाळू नाही शकले ते देशातील जनतेचा काय सांभाळ करणार?', हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. 

ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द पंतप्रधान किंवा भाजप पक्षाकडून देण्यात येणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सोमवारी मोदी आणि बॅनर्जी यांच्यामध्ये झालेल्या या शाब्दिक चकमकीने संपूर्ण राजकीय वर्तुळ आणि साऱ्या देशाचं लक्ष वेधलं. 

'मी मोदींना पंतप्रधान मानतच नाही'

फोनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला बॅनर्जी यांची अनुपस्थिती असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला होता. त्यांच्या  याच आरोपाचं उत्तर देत मोदींना आपण पंतप्रधान मानत नसल्यामुळेच या बैठकीला उपस्थित राहिलं नसल्याचं कारण त्यांनी दिलं होतं. मोदींसोबत कोणत्याही व्यासपीठावर एकत्र यायचं नसून आता चर्चा थेट देशाच्या नव्या पंतप्रधानांशीच होईल, असंही त्या झारग्राम येथील प्रचारसभेत म्हणाल्या होत्या. 
loksabha election 2019