मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नाही- ममता बॅनर्जी

आम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज नाही.

Updated: May 6, 2019, 11:28 PM IST
मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नाही- ममता बॅनर्जी title=

कोलकाता: फोनी चक्रीवादळासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित न राहिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान मानत नसल्याचे म्हटले. त्यामुळेच मी बैठकीला उपस्थित राहिले नाही, असे ममतांनी सांगितले. मला मोदींसोबत कोणत्याही व्यासपीठावर एकत्र जायचे नाही. मी आता थेट देशाच्या नवीन पंतप्रधानांशीच बोलेन. आम्ही चक्रीवादळासाठी आवश्यक ती पूर्वतयारी स्वत:हून करू शकतो. निवडणुकीच्या तोंडावर त्यासाठी आम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज नाही, असे ममतांनी झारग्राम येथील प्रचारसभेत सांगितले. 

ममता बॅनर्जी चक्रीवादळाच्या परिस्थितीचेही राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला होता. केंद्र सरकार बचावकार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील राजकारणामुळे त्यामध्ये अडथळे येत आहेत. मी स्वत: ममता बॅनर्जी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या इतक्या उद्दाम आहेत की, त्यांनी माझ्याशी बोलायला नकार दिला. तरीदेखील मी त्यांच्या फोनची वाट पाहिली. मात्र, त्यांचा फोन शेवटपर्यंत आलाच नाही, असे सांगत मोदी यांनी ममतांना लक्ष्य केले होते. 

नरेंद्र मोदी सोमवारी तमलुक येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी ममतांचा 'जय श्रीराम' बोलण्यालाही विरोध असल्याचा आरोप केला. मात्र, ममतांनी हा दावा फेटाळून लावला. ममता यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, जय श्रीराम ही भाजपची घोषणा आहे. ते सर्वांवर ही घोषणा लादण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुका आल्यावर राम भाजपचा एजंट होतो का, असा सवालही ममतांनी विचारला.