Video: 'ते' दृश्य पाहताच राहुल गांधी तातडीने ताफा थांबवून कारमधून उतरले अन्...

Rahul Gandhi Helps Rider: राहुल गांधी आज अविश्वास ठरावासंदर्भातील चर्चेत सहभागी होण्यासाठी संसदेच्या दिशेने निघाले असता त्यांना रस्त्यात एक दृष्य दिसलं आणि त्यांच्या गाड्यांचा संपूर्ण ताफाच थांबला. यानंतर राहुल गांधी स्वत: लगबगीने खाली उतरले आणि विरुद्ध दिशेला चालू लागले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 9, 2023, 01:46 PM IST
Video: 'ते' दृश्य पाहताच राहुल गांधी तातडीने ताफा थांबवून कारमधून उतरले अन्... title=
10 जनपथजवळ हा संपूर्ण प्रकार घडला

Rahul Gandhi Helps Rider: सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिल्यानंतर राहुल गांधींना सोमवारी त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत राहुल गांधी मंगळवारीच सहभागी होती असं मानलं जातं होतं. मात्र त्यांनी मंगळवारी या विषयावर बोलणं टाळलं. पण आज म्हणजेच बुधवारी (9 ऑगस्ट 2023 रोजी) राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन केंद्रातील भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला. तुम्ही मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे असा घणाघाती हल्लाबोल राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी लोकसभेमध्ये दिलेल्या भाषणाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र याचदरम्यान अन्य एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राहुल गांधी लोकसभेच्या अधिवेशनासाठी घरुन संसदेला येत असताना घडलेल्या एका घटनेचा आहे.

घडलं काय?

झालं असं की, राहुल गांधी संसदेमध्ये जाण्यासाठी निघाले असता सध्या ते वास्तव्यास असलेल्या सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानाजवळ रस्त्यात एका ठिकाणी त्यांना स्कूटरवरील 2 जण रस्त्यावर पडल्याचं दिसलं. एका कारला धडक दिल्याने ही स्कूटर आणि त्यावरील 2 जण खाली पडले. राहुल गांधींनी आपल्या कारमधून हे दृष्य पाहताच ताफा थांबवला. राहुल गांधी स्वत: आपल्या कारमधून खाली उतरले आणि उलट्या दिशेला स्कूटरवरुन पडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी गेले. राहुल गांधी अचानक ताफा थांबवून या लोकांच्या मदतीला गेल्याने त्यांच्या सुरक्षेतील सुरक्षारक्षकांचा काही काल संभ्रम झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. राहुल गांधी स्कूटर उचलण्यास मदत करत असल्याचं पाहून त्यांच्या सुरक्षारक्षकांनीही या व्यक्तींना मदत करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओ व्हायरल

पडलेली स्कूटर उचलल्यानंतर राहुल गांधींनी दोन्ही स्कूटरस्वारांची चौकशी केली. तुम्हाला लागलं तर नाही ना असं राहुल यांनी विचारलं. त्यानंतर त्यांनी नेमकं काय घडलं आणि कसे काय तुम्ही पडलात याबद्दल विचारलं. हा व्हिडीओ याच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीने शूट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या कृतीसाठी राहुल गांधींचं कौतुक केलं आहे.

1)

2)

संसदेमध्ये भाषण दिल्यानंतर राहुल गांधी राजस्थानला रवाना झाले. राजस्थानमध्ये आज ते एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.