'मला मदत करा,' बलात्कारानंतर मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत दारोदारी मागत होती मदत; लोकांनी फक्त शूट केले VIDEO

बलात्कारानंतर 12 वर्षाची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत दारोदारी मदत मागत फिरत होती. पण लोक मदत करण्याऐवजी तिचे व्हिडीओ शूट करत होते. उज्जैनपासून 15 किमी अंतरावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 27, 2023, 01:27 PM IST
'मला मदत करा,' बलात्कारानंतर मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत दारोदारी मागत होती मदत; लोकांनी फक्त शूट केले VIDEO  title=

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. 12 वर्षांची मुलगी बलात्कारानंतर अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत होती. लोकांच्या घराचे दरवाजे ठोठावत ही मुलगी मदत मागत होती. पण लोक मदत करण्याऐवजी दरवाजे बंद करुन घेत होता. यादरम्यान, एक व्यक्ती मुलीची ही अवस्था आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होता. मुलीने काही वेळाने त्या व्यक्तीकडेही मदत मागितली. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे महिलांविरोधात गुन्हे वाढत असताना मुलीचा हा व्हिडीओ काहींसाठी मात्र सामान्य घटनेप्रमाणेच आहे. उज्जैनपासून 15 किमी अंतरावर ही घटना घडली आहे. 

मुलीच्या अंगावर यावेळी पूर्ण अंग झाकू शकतील इतकेही कपडे नव्हते. अंगाला चादर गुंडाळून ती रस्त्यावर फिरत होती. लोकांनी मदत नाकारल्यानंतर अखेर ती एका आश्रमात पोहोचली. तेथील एका पुजाऱ्याला मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आला. यानंतर त्याने तिला टॉवेल दिला आणि जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथं नेलं असता मुलीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. 

मुलगी गंभीर जखमी असल्याने तिला इंदूरला नेण्यात आलं. मुलीला रक्ताची गरज असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपक शिंदे यांनी मुलीला तिचं नाव आणि पत्ता विचारलं असता ती योग्य माहिती देऊ शकली नाही. 

पोलिसांनी अज्ञातांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्जैन पोलीस प्रमुख सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना बेड्या ठोकण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. "वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आम्ही विशेष पथक तयार केलं असून, ते कसून तपास करत आहेत. जर कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी पुढे येऊन पोलिसांना द्यावी असं आमचं आवाहन आहे," असं सचिन शर्मा म्हणाले आहेत.

ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला त्याबद्दल विचारण्यात आलं असता अधिकाऱ्याने सांगितलं की, "आम्ही तपास करत आहोत. लवकरच आम्ही याबद्दल तुम्हाला माहिती देऊ. मुलगी नेमकी कुठची आहे हे ती सांगू शकलेली नाही. पण तिच्या बोलण्यावरुन ती उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील वाटत आहे".

2019 ते 2021 दरम्यान महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक घटना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या आहेत. मध्य प्रदेशात 2021मध्ये देशातातील सर्वाधिक  6462 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार. त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक गुन्हे हे अल्पवयीन मुलांवरील होते. यामधील 18 घटना बलात्काराच्या असतात.