नवी दिल्ली : लाल किल्ल्यावर ध्वजारोहण आणि भाषण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहान मुलांची भेट घेतली... भाषण संपल्यानंतर नरेंद्र मोदी गाडीत बसून निघाले... पण ज्या ठिकाणी सगळी लहान मुलं थांबली होती, तिथे मोदींनी गाडी थांबवली आणि मोदी लहान मुलांना जाऊन भेटले. प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी भेटायला आल्यावर मुलांनाही अतिशय आनंद झाला... आणि मोदींसोबत हस्तांदोलन करण्यासाठी मुलांची प्रचंड गर्दी झाली.
देशाला नव्या आशा नवी स्वप्नं दाखवत पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. या भाषणात मोदींनी गेल्या चार वर्षांतला विकासाचा पाढा वाचला. भारतीयांसाठी महत्त्वाच्या अशा आयुष्मान भारत योजनेची घोषणा नरेंद्र मोदींनी केली. या योजनेचा दहा कोटी गरीबांना फायदा होणार आहे. २०२२ पर्यंत भारत मानवाला अंतरिक्षात पाठवणार, अशी घोषणा मोदींनी लाल किल्ल्यावरुन केली. चंद्रपूरच्या एव्हरेस्टवीरांचं आणि तारिणीवरच्या नौसैनिकांचं मोदींनी कौतुक केलं. त्याचबरोबर २०१३ च्या गतीनं चाललो असतो तर एवढी कामं पूर्ण करायला शंभर वर्षं लागली असती, असं म्हणत मोदींनी गेल्या यूपीए सरकारवर शरसंधान साधलं. मोदींनी भाषणानंतर मुलांमध्ये जाऊन त्यांचं कौतुक केलं.