...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान

Uddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 5, 2024, 03:49 PM IST
...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान title=
जाहीर सभेत ठाकरेंचं विधान

Uddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज कोल्हापूरमधील राधानगरी मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेतली. यावेळेस त्यांनी जाहीर भाषणामध्ये महायुती सरकारवर निशाणा साधला. या सभेला छत्रपती शाहू महाराजांबरोबरच विधान परिषद खासदार सतेज पाटीलही उपस्थित होते. राधानगरीमधील उपस्थितांची संख्या पाहून उद्धव ठाकरेंनी आपण भारावून गेल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी जर तरच्या भाषेत थेट महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना आपण सर्व उमेदवार मागे घ्यायला सांगू, असं म्हटलं. नेमकं उद्धव यांनी असं विधान का केलं हे जाणून घेऊयात.

तो महाराष्ट्राचा शत्रू...

भाषणाला सुरुवात करताना उद्धव ठाकरेंनी, "राधानगरी मतदारसंघ गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पाठीत वार करुन छातीवर वार करायला उभे राहिले आहेत. मान सन्मान प्रेम सगळं दिल्यानंतर सुद्धा शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस हा तुमचा होऊ शकतो का? सतेज सोबत आहे याचं बरं वाटलं. इथल्या विजयाची जबाबदारी मी सतेजवरच टाकतोय. शाहू महाराजांचे आशिर्वाद सोबत आहेतच," असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "गद्दारी, हरामोखोरपणा माझ्या रक्तात नाही. गुलाम बनून महाराष्ट्र विकणारा मी नाहीये. महाराष्ट्र विकणाऱ्यांना जो मदत करेल तो महाराष्ट्राचा शत्रू आहे. जो कोणी मोदी-शाहांची पालखी वाहतोय तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे," असा घणाघात ठाकरेंनी केला.

नक्की वाचा >> 'ज्याचा एकही आमदार...', सरवणकरांची 'ती' टीका जिव्हारी लागल्याने राज ठाकरेंनी नाकारली भेट?

त्या चिमुकलीच्या आईला दीड हजार देण्याचं धाडस दाखवणार का?

विद्यमान सरकारवर ठाकरेंनी निशाणा साधला. "हे टक्केवारीचं, खोके सरकार. सुविधांच्या नावाखाली निविदा काढून खिसे भरायचे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी विद्यमान सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. "निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला तुमची बहीण दिसायला लागली. बदलापूरमध्ये एका बालिकेवर अत्याचार झाल्यानंतर तुमचे निर्धावलेले पोलीस त्या बालिकेच्या आईची तक्रार घ्यायला तयार नाहीत. कोणत्या तोंडाने त्या बालिकेच्या आईला लाडकी बहीण म्हणून दीड हजार रुपये देणार आहात? चार वर्षाच्या मुलीच्या आयुष्य बर्बाद करुन टाकलं. तो नराधम केवळ तुमच्या चमूमधला होता. जाताय त्या आईकडे? लाडकी बहीण 1500 रुपये देण्याचं धाडस दाखवताय?" असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला.

आपण एकसुद्धा उमेदवार महायुतीविरोधात उभा नको करुयात

पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी, "काही जण मला म्हणतात की या लाडकी बहीण योजनेनं काय होणार ओ? किती टक्के परिणाम होणार? बसल्यात इथे माता भगिनी विचारा त्यांना. या योजनेमुळे कुणाचं घर चालत असेल असं जर कोणी हात वर करुन सांगेल तर मी संपूर्ण महाविकास आघाडीला सांगेन की आपण महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार उभा नको करुयात. कारण सगळी घरं खूष आहेत. आहे एकाचं तरी घर समाधानी आहे? ही योजना राबवत आहेत त्यासमोर असणारी वाढणारी महागाई कोणाच्या आवाक्यात नाही," असं ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> सतेज पाटलांनी सगळंच काढलं! फडणवीसांच्या 'कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर म्हणाले, 'आमच्यावर बोलण्यापेक्षा...'

"शिंदेंनी दाढी खाजवून पण..."

"महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. महाराजांच्या पुतळ्यामध्येही पैसे खाणारी ही अवलाद महाराष्ट्राला पुढे नेऊ शकेल असं वाटतंय? राज्यपाल कोश्यारींविरोधात आपण मोर्चा काढला. त्यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांचा अपमान केला. पण ना भाजपाने त्यांचा निषेध केला ना या मिंध्यांनी केला. दाढी खाजवून पण निषेध नाही केला," असंही ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटलं आहे.