नवी दिल्ली : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरलाय. परंतु, 'राणे काँग्रेसमध्ये जाणार नाहीत' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. ते दिल्लीत बोलत होते. राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेचा इन्कार करतानाच 'बुडत्या नावेत कोण बसणार?' असा टोलाही फडणवीसांनी काँग्रेसला लगावलाय. दरम्यान, नारायण राणेही दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. दिल्लीत ते मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. परंतु, यावेळी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देण्यास मात्र नारायण राणेंनी नकार दिला.
विश्वसनीय सूत्रांनी 'झी २४ तास' दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणेंची काँग्रेसमध्ये घरवापसी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राणेंच्या घरवापसीच्या चर्चांना वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे गोवा मार्गे दिल्लीला दाखल झालेले राणे मुख्यमंत्री दालनात दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस आज होणाऱ्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दिल्लीत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा दाखल करणार आहेत. त्याआधी संसदेच्या केंद्रीय सभागृहात भाजपाच्या तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षांची बैठक होणार आहे. एनडीएच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान, अकाली दलाचे नेते सुखबीरसिंह बादल हे नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते आणि भाजपाचे सर्व खासदारही दिल्लीत बैठकीला उपस्थित राहतील. काल संध्याकाळी मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची अखेरची बैठक होऊन त्यात सोळावी लोकसभा विसर्जित करण्यात आली. त्यानंतर मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
पराभवामुळे काँग्रेस संघटनेत कमालीचं नैराश्य आलंय. काँग्रेसमधील मरगळ झटकण्यासाठी राणेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रवेशाची ऑफर होती. राणेही काँग्रेसमध्ये परतण्यासाठी उत्सुक होते.