नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या लागोपाठच्या दुसऱ्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. आज काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सपशेल पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारल्यास पुढचा पक्षाध्यक्ष कोण असेल? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खडगे, सोनिया गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, प्रियंका गांधी, मीरा कुमार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, गुलाम नबी आझाद हे नेते दिल्ली स्थित कार्यालयात उपस्थित आहेत. सलग दुसऱ्या दारुण पराभवातून सावरून भविष्यातील वाटचालीसाठी काँग्रेस पक्षाने मजबूत होण्यासाठी काय केले पाहिजे, याचेही चिंतन बैठकीत अपेक्षित आहे. काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेताना राहुल गांधी यांच्या मदतीला ए. के. अँटनी, अशोक गहलोत, कमलनाथ, अहमद पटेल, अमरिंदर सिंह असे बडे आणि अनुभवी नेते देण्याचाही प्रस्ताव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा अध्यक्ष निवडण्यासाठी गांधी परिवाराशिवाय इतर नेत्यांच्या नावाचाही विचार सुरू आहे. काँग्रेसवर होणारी 'घराणेशाही'ची टीका टाळण्यासाठी याही मुद्दयावर पक्षात विचार-विनिमय सुरू आहे.
राहुल गांधी यांचा राजीनामा मंजूर झालाच तर अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदेंचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय मल्लिकार्जुन खडगे, गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत, तरुण गोगोई, यांचीही नावं चर्चेत आहे. अशोक गहलोत सोनिया, प्रियंका आणि राहुल यांचे जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांच्या नावावरही खल सुरु आहे.