वाराणसी : वाराणसी फ्लायओव्हर दुर्घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपला पक्ष या दुर्घटनेमुळे खूप दु:खी असल्याचं म्हटलंय. ते या दुर्घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी हॉस्पीटलमध्येही दाखल झाले. मीडियाशी बोलताना मात्र त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चांगलेच वादात सापडलेत. फ्लायओव्हर बनवण्याचं काम पूर्ण करण्यासाठी तीन विनायक मंदिर तोडण्यात आले होते, अशी मला माहिती मिळालीय. लोकांच्या म्हणण्यानुसार, मंदिर तोडल्यामुळेच ही दुर्घटना घडलीय, असं वक्तव्य यावेळी राज बब्बर यांनी केलंय.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघातील निष्काळजीपणामुळेच एवढा मोठा अपघात घडल्याचंही त्यांनी म्हटलं. एवढी मोठी दुर्घटना घडली आणि तेव्हा मोदी मात्र सेलिब्रशन करत होते... या दुर्घटनेची जेवढी जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे... तेवढीच जबाबदारी मंत्र्यांचीही आहे... यामुळे दोघांविरुद्ध कडक कारवाई व्हायला हवी.
अधिकाऱ्यांवर तर कारवाई झालीय... परंतु, कॅबिनेट मंत्र्यांनाही निलंबित केलं जायला हवं, असंही राज बब्बर यांनी म्हटलंय. राज बब्बर यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांच्या नुकसान भरपाईऐवजी ५०-५० लाख मिळावेत, अशी मागणी केलीय.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हे काम पूर्ण होणार होतं... परंतु, कमी वेळ मिळाल्यानं अधिकारीही दबावाखाली काम करत होते... त्यामुळेच सुरक्षेची खात्री न करताच काम पूर्ण करण्यात आलं.... आणि ही दुर्घटना घडली, असाही आरोप राज बब्बर यांनी केलाय.
मंगळवारी सायंकाळी ५.४५ मिनिटांनी वाराणसी कॅन्ट रेल्वे स्टेशनजवळ तीन वर्षांपासून बनत असलेला फ्लायओव्हरचा एक भाग कोसळून अपघात घडला. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झालाय... तर २५ हून अधिक जण जखमी झाले. जखमींपैंकी अनेक जण गंभीर अवस्थेत आहेत.