परवानगीसाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांच्या पाया पडायला लागल्या... वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा

Sudhanshu Mani : 38 वर्षांचा अनुभव असलेले निवृत्त मेकॅनिकल इंजिनिअर असलेले सुधांशू मणी हे 'वंदे भारत एक्सप्रेस' या  भारतातील पहिल्या आधुनिक सेमी-हाय स्पीड ट्रेनचे जनक आहेत. या ट्रेनला मंजुरी मिळावी म्हणून त्यांना रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांचे पाय धरावे लागले होते.

Updated: Mar 18, 2023, 05:23 PM IST
परवानगीसाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांच्या पाया पडायला लागल्या... वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मात्यांचा धक्कादायक खुलासा title=

Indian Railway : भारतीय रेल्वेचे आधुनिक रुप असलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सध्या सगळ्यांच्याच पसंतीच उतरत आहेत. देशाच्या विविध रेल्वे मार्गांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी वंदे भारत एक्स्प्रेसचे अनावर केले आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक, वेगवान, मध्यमवर्गाच्या खिशाला परवडेल अशी ट्रेन म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जात आहे. मात्र 2015 मध्ये भारतात सेमी-हाय-स्पीड ट्रेन तयार करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर 2022 साली हे स्वप्न सत्यात उतरले होते.  त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतातील सर्वात प्रगत अशी वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यासोबत सुधांशू मणी (Sudhanshu Mani) हे नाव देखील सध्या चर्चेत आहे.

सुधांशू मणी यांना भारतातील वंदे भारत ट्रेनचे जनक मानले जाते. चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये महाव्यवस्थापक  असताना, सुधांशू मणी यांनी सेमी-हाय स्पीड ट्रेन चालवण्याचे स्वप्न पाहिले. 18 महिन्यांच्या अहोरात्र मेहनतीनंतर मणी यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. ही ट्रेन होती वंदे भारत एक्स्प्रेस. परदेशातून ट्रेनसेट आयात करण्यासाठी लागणाऱ्या किंमतीच्या एक तृतीयांश किमतीत मणी यांनी ही ट्रेन तयार केली. मात्र यासाठी त्यांनाही लालफितीच्या कारभाराचा सामना करावा लागल्याचे समोर आले आहे.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुधांशू मणी वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मितीचा प्रवास सांगितला आहे. यावेळी त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला मंजुरी मिळावी यासाठी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांच्या पाया पडाव्या लागल्या होत्या असेही सांगितले आहे. "एक तृतीयांश खर्चात जागतिक दर्जाची ट्रेन बनवण्याच्या आमच्या टीमच्या दाव्याबद्दल रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मनात संशय होता. त्यांना वाटले की आमचा दावा केवळ प्रसिद्धी आहे. कंटाळून मी रेल्वे बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षांकडे गेलो. मी त्यांना परदेशात असलेल्या ट्रेनच्या तुलनेत एक तृतीयांश किमतीत जागतिक दर्जाची ट्रेन तयार करू शकतो असे आश्वासन दिले," असे सुधांशू मणी म्हणाले.

परवानगी द्या नाहीतर पाय सोडणार नाही...

"रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष 14 महिन्यांत निवृत्त होणार होते. त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी खोटे बोलावे लागले. त्यांच्या निवृत्तीपूर्वी ही ट्रेन तयार होईल आणि ते उद्घाटन करतील, असे आम्ही त्यांना सांगितले होते. एवढ्या कमी वेळात हे काम पूर्ण होणे शक्य नाही हे आम्हाला माहीत होते. एवढं सगळं करूनही त्यांनी ऐकले नाही म्हणून मी त्यांचे पाय धरले. जोपर्यंत  आम्हाला या प्रकल्पासाठी परवानगी देत ​​नाही तोपर्यंत पाय सोडणार नाही, असे मी त्यांना सांगितले. अखेर आम्हाला ही ट्रेन तयार परवानगी मिळाली. परवानगी मिळताच संपूर्ण टीम कामाला लागली," असेही मणी म्हणाले.