लखनऊ: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह याचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. ४ जुलैपासून लखनऊच्या SGPGI रुग्णालयात ते दाखल होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. आज सकाळपासून कल्याण सिंह यांचा रक्तदाब कमी होत होता. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं शनिवारी उपचारादरम्यान निधन झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'कल्याण सिंहजी यांनी देशातील करोडो वंचित आणि शोषित लोकांसाठी काम केलं. त्यांनी शेतकरी, युवक आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप काम केलं.
Kalyan Singh Ji gave voice to crores of people belonging to the marginalised sections of society. He made numerous efforts towards the empowerment of farmers, youngsters and women.
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2021
कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी झाला होता. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर १९९७-९९ या काळातही ते मुख्यमंत्री राहीले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याच सरकारच्या काळात ६ डिसेंबेर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्याची घटना घडली होती, ज्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. २००९ मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. तर, २६ ऑगस्ट २०१४ मध्ये ते राजस्थानचे राज्यपाल बनले होते.