उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

 भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. 

Updated: Aug 21, 2021, 11:01 PM IST
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले. 89 वर्षीय कल्याण सिंह गेल्या दीड महिन्यांपासून लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल होते. महिन्याभरापूर्वी, त्यांना श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते, त्यानंतर आदल्या दिवशी त्याची प्रकृती अधिकच बिघडली. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदल्या दिवशी दिल्लीहून परतले होते आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी ते थेट रुग्णालयात गेले होते. यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी पुन्हा रुग्णालयात पोहोचले. कल्याण सिंह यांनी शनिवारी रात्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला

कल्याण सिंह हे राजस्थानचे राज्यपाल देखील होते, ते भाजपचे संस्थापक नेते होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा समावेश आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोनवर कल्याण सिंह यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांनी कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटले की, मी खूप दु: खी आहे. कल्याण सिंह जी ... एक राजकारणी, अनुभवी प्रशासक, तळागाळातील नेते आणि एक महान मानव होते. उत्तर प्रदेशच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान आहे. मी त्यांचा मुलगा राजवीर सिंह यांच्याशी बोललो आणि शोक व्यक्त केला. ओम शांती.