कोर्टात जात असतानाच पोलिसांनी आरोपीला घेऊन दिली दारु; फोटो झाला व्हायरल

UP Police : व्हायरल फोटोमध्ये गुन्हेगाराचे हात बांधलेले आहेत. तर पोलिसांच्या हातात दोरी आहे आणि आरोपी दारूच्या दुकानात उभा आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलीस किती उदार आहेत हे दिसते अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

आकाश नेटके | Updated: May 5, 2023, 06:06 PM IST
कोर्टात जात असतानाच पोलिसांनी आरोपीला घेऊन दिली दारु; फोटो झाला व्हायरल title=

Viral News : उत्तर प्रदेश पोलीस (UP Police) सध्या एन्काऊंटरच्या कारवाईमुळे (Encounter) देशभरात चर्चेत आहेत. याच कार्यपद्धतीवरुन उत्तर प्रदेश पोलिसांवर अनेकदा बोट उचललं जातं. रोखठोक कारवाईमुळे अनेकदा उत्तर प्रदेश पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात. आरोपींवर अत्याचार केल्याचा आरोपही उत्तर प्रदेश पोलिसांवर केला जातो. 2021 मध्ये पोलीस कोठडीत (Police Custody) सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशातच झाले आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलीस ताब्यात असलेले आरोपींची काळजीसुद्धा घेताना दिसत आहे. याचाच पुरावा म्हणून एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये उत्तर प्रदेश पोलीस हातकड्या घातलेल्या एका आरोपीला दारुच्या दुकानावर घेऊन गेल्याचे दिसत आहे.

इंग्रजी दारुच्या दुकानात घेऊन गेला पोलीस कर्मचारी

उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमधील हा फोटो असल्याचे म्हटले जात आहे. फोटोमध्ये हातकडी घातलेला गुन्हेगार इंग्रजी दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना दिसत आहे. तर प्रांतीय रक्षक दलाचा (पीआरडी) जवान हातकड्यांचा दोर धरून त्याच्या मागे उभा असल्याचे दिसत आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक दीक्षा शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल, असेही दीक्षा शर्मा यांनी म्हटले आहे. या आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार होते. मात्र त्याला दारु पिण्याची इच्छा झाली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याने त्याला दारुच्या दुकानावर नेले.

कोर्टात नेत असताना झाली दारु पिण्याची इच्छा

हमीरपूरच्या कुरारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 28 एप्रिल रोजी पहिल्यांदा हा फोटो समोर आला होता. इंदल नावाच्या आरोपीला हाणामारीच्या प्रकरणात कुरारा पोलीस कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन चालले होते. पोलिसांनी त्याच्यावर हल्ल्याच्या संदर्भातील सीआरपीसीच्या कलम 151 अंतर्गत कारवाई केली होती. याच दरम्यान, पोलिसांना दारू हवी असल्याचे सांगितले. इंदलची मागणी ऐकून पोलिसांनी वाहन थांबवून त्याला दारू घ्यायला दिली. दरम्यान, कोणीतरी इंदलचा फोटो काढला. या फोटोमध्ये पीआरडीचा जवानही दिसत होता. यानंतर जिल्ह्यातील पोलिसांची गळचेपी होत आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, यावेळी इंदलसोबत दोन पोलीस कर्मचारी होते. मात्र या घटनेनंतर पोलीस विभागाची झोप उडाली आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी चौकशीचे आदेश दिले.

हमीरपूरच्या पोलीस अधीक्षक दीक्षा शर्मा यांनी या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहे. "हमीरपूर जिल्ह्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पीआरडी जवान आरोपीला दारू घेऊन देताना दिसत आहे. या फोटोची दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला त्या पीआरडी जवानावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोषी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यावरही लवकरच कारवाई केली जाईल," अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षा शर्मा यांनी दिली.