Shocking News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी एका खाजगी दवाखान्यात ठेवलेल्या दोन नवजात बालकांचा एअर कंडिशनरच्या (AC) थंडीमुळे मृत्यू झाला आहे. हलगर्जीपणामुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी (UP Police) महिला डॉक्टरला अटक केली आहे. बालकांच्या कुटुबियांनी आरोप केला की, महिला डॉक्टर रात्री झोपताना एसी चालू करुन झोपली होती. त्यामुळे बालकांचा मृत्यू झाला. कुटुबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या शामली जिल्ह्यातील कैराना भागातील एका खाजगी दवाखान्यात हा सगळा प्रकार घडला आहे. दोन नवजात बालकांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एअर कंडिशनरच्या थंडीमुळे दोन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. त्यानुसार पोलिसांनी महिला डॉक्टरला अटक केली आहे. शनिवारी कैराना येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांचा जन्म झाला आणि त्याच दिवशी त्यांना खासगी दवाखान्यात हलवण्यात आले होते.
नवजात बालकांच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, क्लिनिकच्या मालक डॉ नीतू यांनी शनिवारी रात्री झोपण्यासाठी एअर कंडिशनर चालू केले आणि ते चिल्ड मोडमध्ये ठेवले होते. ज्यामुळे खोली पूर्णपणे थंड झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी कुटुंबीय मुलांना पाहण्यासाठी गेले असता ते मृतावस्थेत आढळले. यानंतर कुटुंबियांनी क्लिनिकमध्ये मोठा गोंधळ घातला आणि पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवली.
कैराना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकांच्या कुटुंबीयांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत डॉक्टर नीतू यांना आरोपी बनवण्यात आले आहे. डॉ. नीतू सिंहविरोधात भादवि कलम 304 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितू सिंहला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.