'प्या साहेब काही होत नाही'; हवालदाराला दारु पाजून कैद्याने काढला पळ

UP Crime : उत्तर प्रदेश पोलिसांच्या धडक कारवाईचे अनेकदा कौतुक होत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैद्याने पोलीस हवालदाराला दारु पाजून पळ काढला आहे. या प्रकारानंतर हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 5, 2023, 04:05 PM IST
'प्या साहेब काही होत नाही'; हवालदाराला दारु पाजून कैद्याने काढला पळ  title=

Crime News : उत्तर प्रदेश पोलीस (UP Police) हे त्यांच्या एन्काऊंटरच्या धडक कारवाईमुळे कायमच चर्चेत असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या (UP Crime) हरदोईमध्ये एक पोलिसांच्या पेशाला धक्का बसवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई येथील जिल्हा कारागृहातून (Central Jail) पोलिसांच्या ताब्यातून न्यायालयात आणलेला कैदी हवालदाराला दारू पाजून फरार झाला आहे. संध्याकाळपर्यंत कैदी आणि हवालदार कारागृहामध्ये न पोहोचल्याने सर्वच चिंतेत होते. त्यानंतर दोघांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तपासानंतर हवालदार त्याच्या भाड्याच्या खोलीत मद्यधुंद अवस्थेत सापडला, तर कैदी फरार झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी हवालदाराला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि कैद्याचा शोध सुरु केला. तर हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.

कोर्टात हजर केल्यानंतर गायब झाला कैदी

2018 मध्ये चोरीच्या प्रकरणात सीतापूर जिल्ह्यातील नैमिशारण्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर गावातील रहिवासी असलेल्या फुरकानला हरदोई जिल्ह्यातील पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले होते. तेव्हापासून फुरकान जिल्हा कारागृहात होता. शुक्रवारी फुरकानला न्यायालयात नियमित सुनावणीसाठी हजर करायचे होते. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास कारागृहातून पोलीस कोठडीत असलेल्या अन्य कैद्यांसह फुरकानलाही न्यायालयात आणण्यात आले होते. फुरकानला हवालदार उमानाथ श्रीवास्तव यांच्यासह न्यायालयात पाठवण्यात आले. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही संध्याकाळपर्यंत कारागृहात परतायचे होते. पण दोघेही परत आले नाहीत म्हणून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला.

त्यानंतर पोलीस हवालदार उमानाथ श्रीवास्तव यांच्या भाड्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी उमानाथ श्रीवास्तव हे मद्यधुंद अवस्थेत खोलीत होते तर कैदी फुरकानने पळ काढला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर कैद्याच्या शोधात पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

कसा निसटला कैदी?

हवालदार उमानाथ श्रीवास्तव फुरकानच्या काही साथीदारांना कोर्टात भेटला होता. त्यावेळी फुरकानच्या साथीदारांनी उमानाथला दारु पाजून तिथून पळून जाण्याची योजना आखली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमानाथला देखील दारुचे व्यसन होते आणि त्यामुळेच तो जाळ्यात अडकला. फुरकानला कोर्टात हजर केल्यानंतर तो कैद्याला घेऊन त्याच्या घरी गेला. तिथे फुरकानच्या मित्रांनी उमानाथला भरपूर दारु पाजली. यामुळे उमानाथला भरपूर नशा चढली. त्यानंतर फुरकान त्याच्या साथीदारांसह तिथून फरार झाला.