बलात्काराच्या गुन्ह्यात 'त्याने' भोगली 4 वर्षे शिक्षा, आता 'ती' तरुणी तुरुंगात आणि तो बाहेर; काय आहे प्रकरण?

UP Crime: अजय उर्फ राघव या तरुणाने 4 वर्षे बलात्काराची शिक्षा भोगली. यानंतर न्यायालयाला संपूर्ण घटनेवर संशय आल्याने त्यांनी 'पीडित' तरुणीची चौकशी केली. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 20, 2024, 10:43 AM IST
बलात्काराच्या गुन्ह्यात 'त्याने' भोगली 4 वर्षे शिक्षा, आता 'ती' तरुणी तुरुंगात आणि तो बाहेर; काय आहे प्रकरण? title=
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात शिक्षा

UP Crime: बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये कोर्टाकडून कठोर शिक्षा केली जाते. महिलांवरील अत्याचारासारखा गंभीर गुन्हा पुन्हा घडू नये किंवा तसा संदेश समाजात जावा हा यामागचा प्रयत्न असतो. पण काही महिला याचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करत असल्याच्या घटना समोर येत असतात. असाच एक प्रकार  उत्तर प्रदेशातील बरेली येथून समोर आलाय. येथे एक तरुण बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली 4 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. पण आता त्या तरुणीलाच कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. काय घडलाय नेमका प्रकार? जाणून घेऊया. 

न्यायालयाला आला संशय आणि...

अजय उर्फ राघव या तरुणाने 4 वर्षे बलात्काराची शिक्षा भोगली. यानंतर न्यायालयाला संपूर्ण घटनेवर संशय आल्याने त्यांनी 'पीडित' तरुणीची चौकशी केली. यात धक्कादायक खुलासे होत गेले. त्यानंतर तरुणाची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि तरुणीला तुरुंगात टाकले. निरपराध तरुणांना खोट्या आरोपाखाली जशी शिक्षा भोगावी लागली तशीच शिक्षा या मुलीलाही भोगावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच पीडित तरुणाला 5 लाख रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने तरुणीला दिले आहेत. तुरुंगात असताना त्या राघवने बाहेर राहून मजूर म्हणून काम केले असते तर त्याला 5 लाख 88 हजार रुपयांहून अधिक कमाई झाली असती, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या मुलीकडून ही रक्कम वसूल करून त्या निष्पाप मुलाला देण्यात यावी. जर मुलीने ते देण्यास नकार दिला तर तिची शिक्षा 6 महिन्यांनी वाढवावी, असे न्यायालयाने कोर्टाच्या या निर्णयानंतर पीडित ​​राघव आनंदी आहे.कोर्टात अशा आरोपांचे निराकरण होते पण समाज त्याच्याकडे त्याच दृष्टीकोनातून पाहतो, याची खंत त्याच्या मनात कायम आहे. 

काय आहे प्रकरण?

2019 मध्ये  हे प्रकरण घडले होते. श्रावणातील कार्यक्रमासाठी आरोपी मुलगी तिची मोठी बहीण नितूसोबत त्याच्याकडे आली होती. मलाही हा कार्यक्रम शिकायचा आहे, असे तिने राघवला सांगितले. यासाठी अजय उर्फ राघव मुलीच्या घरी जायचा. कार्यक्रम झाला तेव्हा नीतूचा नवराही तिच्यासोबत होता. आपण कशासाठी आलोय हे तिच्या आई आणि भावालाही माहीत होते, असे राघव सांगतो. एकदा माझ्या आईची तब्येत बिघडली तेव्हा मला आईकडे जावं लागेल, असं सगळ्यांना सांगून मी तिथून निघून गेलो. त्या दिवशीपासून ती मुलगीही गायब झाली होती. नंतर ती सापडली. पण तिने माझ्यावर अपहरण आणि बलात्काराचा आरोप केला असे राघवने सांगितले. तरुणीच्या एका आरोपामुळे माझे करिअर खराब झाले. मी कुठेही गेलो की लोक माझ्याकडे संशयाने पाहू लागतात, असे तो सांगतो. हे सांगताना राघव भावूक झाला होता. 

सहीमुळे अडकली स्वत:च्या जाळ्यात

न्यायालयात साक्ष देताना मुलीने गडबड केल्याने ही बाब उघडकीस आली. तिने प्रथम न्यायाधीशांसमोर स्वतःला निरक्षर घोषित केले आणि नंतर इंग्रजीत सही केली. ती खोटे बोलत असल्याचे न्यायाधीशांनाही समजले. यानंतर तिच्यावर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.