उत्तर प्रदेशमध्ये ATS ची मोठी कारवाई, 2 अतिरेक्यांना केली अटक

अटक करण्यात आलेले अतिरेकी मोठा कट रचत असल्याचा संशय असून त्यांच्याकडून कुकर बॉम्ब जप्त करण्यात आला आहे

Updated: Jul 11, 2021, 04:03 PM IST
उत्तर प्रदेशमध्ये ATS ची मोठी कारवाई, 2 अतिरेक्यांना केली अटक title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये एटीएसने (ATS) मोठी कारवाई करत दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. या दोघांचे अल्-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेशी (Terrorist organization) संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रेशर-कुकर बॉम्ब (Pressure Cooker Bomb) जप्त करण्यात आला असून इतरही अनेक शस्त्रास्त्रं (Weapons) पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

एटीएसचं सर्च ऑपरेशन

लखनऊमधल्या काकोरी परिसरात अतिरेकी असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने काकोरी परिसरात दोन घरांवर छापा टाकला. यावेळी एटीएससोबत स्थानिक पोलिसांचाही समावेश होता. सुरक्षेच्या कारणास्तव आसपासच्या परिसरातही पोलीस तैनात करण्यात आले होते. एटीएसने केलेल्या कारवाईत दोन अतिरेक्यांना अटक करण्यात आली असून यातल्या एका अतिरेक्याचं नाव शाहिद असं आहे. 8 वर्षांपूर्वी तो दुबईवरुन आला होता आणि इथं तो गॅरेजचं काम करत होता.

अटक करण्यात आलेले अतिरेकी एका मोठ्या हल्ल्याचा कट आखत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शाहीदच्या घरातून प्रेशर कुकर बॉम्ब पोलिसांना मिळाला असून अर्धवट अवस्थेतील एक टाईम बॉम्बही पोलिसांनी जप्त केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोनही अतिरेक्यांचा अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असून उमर अल मंदी नावाचा व्यक्ती त्यांना सूचना देत होता. उमर अल मंदी पाकिस्तान-अफगाणिस्तान बॉर्डरवर लपला असल्याची माहितीही पोलिसांनी मिळाली आहे. 

या परिसरात आणखी काही अतिरेकी लपले आहेत का याचा शोध सध्या एटीएस आणि पोलीस घेत असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  सर्च ऑपरेशन सुरु असेपर्यंत या भागातील वाहतूक बंद राहील, असं देखील कळवण्यात आलं आहे.