Odisha Train Tragedy: ओडिशामध्ये (Odisha Train Accident) तीन ट्रेनमध्ये झालेल्या विचित्र अपघातात 275 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तसंच 1100 हून अधिक लोक जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी युद्घस्तरावर बचावकार्य सुरु असून, तब्बल दोन दिवसांनी रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. यादरम्यान, या दुर्घटनेसंबंधी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रसारमाध्यमांशी बोलताना दुर्घटनेत बेवारस मृतदेहांचा उल्लेख करताना त्यांचा गळा भरुन आला होता. याचवेळी त्यांनी अद्याप आमची जबाबदारी अद्याप संपली नसल्याचं म्हटलं.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेवा सुरळीत झाल्याची माहिती रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. यावेळी ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की "बालासोर रेल्वे दुर्घटनास्थळी सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक खुली झाली आहे. दिवसा एका बाजूचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. आता दुसऱ्या बाजूचंही काम पूर्ण झालं आहे". यानंतर अश्विनी वैष्णव यांनी बेवारस मृतदेहांचा उल्लेख केला. "ट्रॅक आता सुरळीत झाला आहे. पण अद्याप आमची जबाबदारी पूर्ण झालेली नाही," असं ते भावूक होत म्हणाले.
#WATCH | Balasore,Odisha:..."Our goal is to make sure missing persons' family members can find them as soon as possible...our responsibility is not over yet": Union Railway Minister Ashwini Vaishnaw gets emotional as he speaks about the #OdishaTrainAccident pic.twitter.com/bKNnLmdTlC
— ANI (@ANI) June 4, 2023
रेल्वेमंत्र्यांनी भरलेल्या गळ्याने सांगितलं की "बेवारस झालेल्यांची कुटुंबीयांशी लवकरात लवकर भेट व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आमची जबाबदारी अद्याप संपलेली नाही".
घटनास्थळी 24 तास युद्धपातळीवर काम केलं जात आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी ठाण मांडून बसले आहेत. हजारो रेल्वे कर्मचारी, बचावकार्य पथकं, तंत्रज्ञांपासून ते इंजिनिअर्स सर्वजण दिवसरात्र काम करत आहेत. घटनास्थळी दुर्घटनेनंतर असणारं भीषण चित्र आता बदलत आहे. ट्रॅकवरील ट्रेनचे डबे आता हटवण्यात आले आहेत.
दुर्घटनेनंतर 51 तासांनी ट्रॅकवर पहिली ट्रेन धावली आहे. रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी पहिली ट्रेन चालवून पाहण्यात आली. रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत ही ट्रेन धावली. कोळसा घेऊन जाणारी ही ट्रेन विझाग पोर्ट ते राउरकेला स्टील प्लांटपर्यंत गेली. ज्या ट्रॅकवर शुक्रवारी बंगळुरु-हावडा ट्रेन दुर्घटनाग्रस्त झाली त्याच ट्रॅकवर ही ट्रेन चालवण्यात आली. यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करत सांगितलं की, "डाउन लाइनचं काम पूर्ण करण्यात आलं असून, ट्रॅक सुरळीत झाला आहे. सेक्शनवर पहिली ट्रेन चालवण्यात आली".