Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतामरण यांनी गुरुवारी, 1 फेब्रुवारी 2024 रोजी नव्या संसदेमध्ये देशाचा 2024- 25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या (Loksabha Elections 2024) धर्तीवर सादर झालेला हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यामध्ये फार मोठ्या घोषणा अर्थ मंत्र्यांनी केल्या नसल्या तरीही हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची बाब त्यांनी सुरुवातीपासूनच अधोरेखित केली.
महिला, गरीब, शेतकरी आणि देशातील युवा या घटकांना अर्थसंकल्पामध्ये विशेष स्थान दिलं गेल्याचं पाहायला मिळालं. सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या वतीनं कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या अनेक तरतुदी देशापुढे मांडल्या. यावेळी सरकारच्या वतीनं पिक कापणीनंतरच्या प्रक्रियेसाठी सार्वजनिक आणि वैयक्तिक गुंतवणुकीला आणखी वाव देईल असं सीतारमण यांनी जाहीर केलं. (Union Budget 2024 in Marathi)
सरकारच्या वतीनं 5 इंटीग्रेटेड एक्वा पार्कही सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राई, तीळ, शेंगदाणा यांसारख्या पिकांच्या उत्पादनाला सरकार आणखी प्राधान्य देणार असून, मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देणार असून या क्षेत्रांसाठी काम करणार आहे. कृषी क्षेत्रासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानं परिपूर्ण असणाऱ्या मागणी, साठवण आणि पुरवठा या साखळीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं.
फक्त कृषी नव्हे, तर त्यासोबत चालणाऱ्या दुग्धव्यवसायाच्या विकासासाठीसुद्धा सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दुग्धव्यवसायात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार विशेष योजना राबवणार असून, यामध्ये नॅनो DAP चा वापरही वाढवम्यात येणार असल्याचं सांगितलं.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेती, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केलेल्या असतानाच इथं आता या क्षेत्राशी संबंधित काही शेअर्सची चलती पाहायला मिळणार असल्याचं वृत्त Zee Business नं प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये जाणकारांच्या मते Kaveri Seeds, UPL Ltd, PI Industries, Coromandel International, Chambal Fertilizers, BASF India, Bombay Burmah अशा शेअर्सवर विशेष लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.