Union Budget: योजना, सवलती अन् बरंच काही... मोदी सरकाकडे पैसा येतो कुठून?

Budget 2023-24 Where rupee will come from And how it will be spent: केंद्र सरकाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांसाठीचा पैसा कसा आणि कुठून उभा केला जातो?

Updated: Feb 1, 2023, 02:39 PM IST
Union Budget: योजना, सवलती अन् बरंच काही... मोदी सरकाकडे पैसा येतो कुठून? title=
Where rupee will come from And how it will be spent

Union Budget 2023-24 Where rupee will come from And how it will be spent: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आज आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. कर सवलतीच्या रुपात सर्वसामान्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सर्वच क्षेत्रांसाठी मोठी आर्थिक तरतूद केंद्राने केली आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक असल्याने यंदाचा अर्थसंकल्प कसा असेल याबद्दलची उत्सुकता सर्वसामान्यांमध्येही होती. मात्र या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आलेला निधी सरकारकडे नेमका येतो कुठून आणि तो कशाप्रकारे खर्च केला जातो हे सामन्यांना सहज समजत नाही. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या घोषणा आणि तरतुदींचा विचार केल्यास या आर्थिक वर्षात केंद्राकडे रुपया कोणत्या माध्यमातून येणार आणि कसा खर्च होणार हे पाहूयात...

पैसा येणार कसा?

यंदाच्या अर्थसंकल्पामधील घोषणांचा विचार केला असता केंद्र विविध योजनांसाठी निधी कसा मिळवणार यासंदर्भातील टक्केवारी सांगायची झाल्यास 15 टक्के निधी आयकरातून येईल. तसेच 34 टक्के निधी इतर माध्यमातून उभा केलेला पैसा, 7 टक्के केंद्रीय उपकराच्या माध्यमातून सरकारकडे जमा होईल.

नॉन-टॅक्स रिसिप्ट्समधून 6 टक्के, नॉन डिबेट कॅपिटल रिसिप्ट्समधून 2 टक्के, कस्टममधून 4 टक्के, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्समधून 17 टक्के, कॉर्परेट टॅक्समधून 15 टक्के निधी सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे.

पैसा कुठे जाणार?

केंद्र सरकारच्या तिजोरीमधून यंदाच्या आर्थिक वर्षात खर्च होणाऱ्या निधीपैकी 4 टक्के निधी पेन्शनधारकांवर खर्च होणार आहे. 20 टक्के रक्कम ही घेतलेल्या करांवरील व्याज म्हणून खर्च होणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थसहाय्याने राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी 9 टक्के रक्कम खर्च केली जाईल. इतर खर्चांसाठी एकूण मिळकतीच्या 8 टक्के रक्कम खर्च होईल असा सरकारचा अंदाज आहे. राज्य सरकारांना केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या हिस्सेदारासाठी एकूण मिळकतीच्या 18 टक्के निधी खर्च होईल.

केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी 7 टक्के रक्कम खर्च होईल असा अंदाज आहे. संरक्षण क्षेत्रासाठी 8 टक्के निधी खर्च होणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांसाठी 17 टक्के निधी खर्च होईल. फायनान्स कमिशन आणि इतर ट्रान्सफरसाठी एकूण 9 टक्के रक्कम खर्च होणार असल्याचा सरकारचा अंदाज आहे.

मोदींनी केलं अर्थमंत्र्यांचं कौतुक

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना कररचनेमध्ये सुधारणा करुन मोठी सवलत देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पानंतर देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये हा अर्थसंकल्प देशाला मजबूत बनवणारा अर्थसंकल्प असल्याचं सांगत केंद्रीय अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्राने जनहिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असंही मोदी म्हणाले. समाजातील सर्व घटकांना या अर्थसंकल्पाचा फायदा होणार आहे, असं मोदी म्हणाले.