अयोध्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. ते शनिवारी अयोध्येतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन केली आहे. या ट्रस्टचे बँक खाते कालच सुरु झाल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आम्ही राम मंदिराच्या निर्माणासाठी 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून आम्ही आमच्या भगव्या परिवारातर्फे या बँक खात्यामध्ये १ कोटी रुपये जमा करु इच्छितो. यामागे आमचा कोणताही राजकीय हेतू नाही. एक रामभक्त म्हणून आम्ही हे पैसे देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तसेच आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतल्याचे उद्धव यांनी सांगितले. या भेटीवेळी शक्य झाल्यास अयोध्येत महाराष्ट्रातील रामभक्तांच्या निवासासाठी एखादी जमीन मिळावी, अशी मागणी मी केली. जेणेकरून आम्ही त्याठिकाणी महाराष्ट्र भवन उभारू, असे उद्धव यांनी सांगितले.
राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून १ कोटींचा निधी; उद्धव ठाकरेंची घोषणा
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मी पहिल्यांदा नोव्हेंबर २०१८ मध्ये अयोध्येला आलो. त्यावेळी शिवनेरीवरची माती मी याठिकाणी घेऊन आलो होतो. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही मी सर्व खासदारांना घेऊन अयोध्येत आलो. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. त्याच नोव्हेंबर महिन्यात मी मुख्यमंत्री झालो. आता तिसऱ्यांदा मी अयोध्येत आलो आहे. मी दरवेळी यशस्वी होऊन याठिकाणी येतो. हे कायम घडत राहो, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.