प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये इफ्को प्लान्टमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांना मृत्यू झाला. युरिया तयार करण्यात येणाऱ्या प्लान्टमध्ये रात्री उशिरा गॅस गळती झाल्यानंतर ही दुर्घटना घडली. फुलपूरमधील इफ्कोमध्ये (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited) (IFFCO) झालेल्या गॅस गळतीमुळे दोन जणांचा गुदमरुन मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. प्लांटच्या एका युनिटमध्ये अमोनिया गॅस गळतीमुळे इफ्कोचे दोन वरिष्ठ अधिकारी व्ही.पी. सिंह आणि अभय नंदन यांचा मृत्यू झाला. तर गॅसमुळे अनेकांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गॅस गळती झालेल्या परिसरात असलेल्या १५ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Two persons have died in a gas leakage at IFFCO (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited) plant in Phoolpur. A plant unit has been closed. The gas leakage has stopped now: Prayagraj DM Bhanu Chandra Goswami
— ANI UP (@ANINewsUP) December 23, 2020
ही दुर्घटना घडली त्यावेळी प्लान्टमध्ये जवळपास १०० कर्मचारी-अधिकारी नाईट शिफ्टमध्ये काम करत होते. गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच एकच गोंधळ निर्माण झाला. अमोनिया वायुमुळे श्वासोच्छवास कठीण झाल्याने काही कर्मचारी तिथेच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मदतकार्य त्वरित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना घटनेचे कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत.