कोरोना रुग्ण आसपास असल्यास मोबाईलवर अलर्ट, जाणून घ्या

कोरोनाग्रस्त व्यक्ती आजुबाजूला असल्यास तुम्हाला अलर्ट मिळणार 

Updated: Apr 2, 2020, 11:53 PM IST
कोरोना रुग्ण आसपास असल्यास मोबाईलवर अलर्ट, जाणून घ्या  title=

नवी दिल्ली : लॉकडाऊन असूनही अनेकजण तुमच्या आजुबाजूला भटकत असतात. मेडिकल, रेशन दुकान अशा ठिकाणी अनेकजण आपल्यापासून काही अंतरावरच असतात. यामध्ये कोरोनाग्रस्त कोण आहे ? हे कळणं कठीण असतं. पण आता ही चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही. केंद्र सरकारने एक नवे एप बनवले असून कोरोनाग्रस्त व्यक्ती आजुबाजूला असल्यास तुम्हाला अलर्ट मिळणार आहे. 

आयटी मंत्रालयाने 'आरोग्य सेतू' नावाने हे एप लॉंच केले असून हिंदी आणि इंग्रजी सहीत ११ भाषांमध्ये हे उपलब्ध असणार आहे. प्ले स्टोअरमधून हे तुम्ही मोफत डाऊनलोड करु शकता. या एपच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.  

हे एप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. एपमध्ये असलेल्या अल्गोरिदम आणि आर्टीफिशल इंटेलिजस या माहितीवरुन रुग्ण ओळखू शकणार आहे. जर कोणता संक्रमित रुग्ण असेल तर तुम्हाला लगेच कळणार आहे. 

हे नवे एप प्रायवेट-पब्लिक पार्टनरशिप अंतर्गत सुरु राहणार आहे. आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत हे एप सुरु राहणार आहे. यामधील नागरिकांची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही इतर व्यक्तींपर्यंत किंवा माहिती मिळवण्याच्या उद्देशाने वापरली जाणार नाही.

पंतप्रधानांनी केलेल्या सूचना 

१. लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी  करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्याटप्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे

२. देशात आत्तापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे झाले असे नाही. आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे पर्यटन ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.
 
३. कोरोनाचा लढा सुरूच राहील पण शांती, सद्भाव, एकता  राखणे महत्वाचे आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन  वगैरे तंत्रज्ञांचा उपयोग करा.

४.  कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करीत नाहीत. एनसीसी, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या.

५. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती , तज्ञ , यांचे टास्क फोर्स तयार करा , त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या

६. सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्याने घ्यावयाचा आहे. सर्व राज्यांत यादृष्टीने  संतुलन हवे. दोन चार दिवस वृत्तपत्रांत प्रसिध्दही मिळेल पण कोरोनाचे संकट वास्तवात खूप मोठे आहे हे लक्षात ठेवा.

७. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरु होईल . पण एकदम सर्व गर्दी होईल ग्रामीण भागात असे ए करू नका. त्याची विभागणी करा . शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी  वाहन ठरविल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही.

८. पीएम गरीब कल्याण बँक खात्यातली रक्कम काढायला गर्दी होते आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा.

९. ११ हजार कोटी केंद्राने राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत.

१०. आयुष्य मंत्रालयाने त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा.

११. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असे म्हटले आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळताहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे.