CORONA : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अशी सुरु आहे तयारी

पाहा कसा होणार दैनंदिन जीवनावर परिणाम   

Updated: May 15, 2020, 05:21 PM IST
CORONA : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अशी सुरु आहे तयारी title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशभरात CORONAVIRUS कोरोना विषाणूने घातलेलं थैमान पाहता आता, संपूर्ण देश हा लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या सुरु असणारा टाळेबंदीचा तिसरा टप्पा हा अवघ्या काही दिवसांतच संपून औपचारिकरित्या देश या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. १८ मे पासून सुरु होणारा चौथा लॉकडाऊन हा काही अंशी वेगळ्या स्वरुपाचा असेल. 

चौथ्या टप्प्यात शक्य त्या क्षेत्रांतील व्यवहार सामान्य रितिने .कार्यान्वित ठेवण्याकडे शासनाचा कल असेल. शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचे निर्बंध शिथिल करण्याकडेच सरकारचा कल असेल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. कोरोनाचा धोका कमी असणाऱ्या भागांमध्ये वाहतुकीचे नियम बदलले जाऊ शकतात. ज्यासाठी अनेक राज्य तयारही होत आहेत. 

कशी सुरु आहे लॉकडाऊन ४ ची तयारी? 

लॉकडाऊनच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये निर्बंध लावण्यात आलेले काही उद्योग आणि व्यवसाय अर्थव्यवस्थेची गरज पाहता या चौथ्या टप्प्यात पुन्हा सुरु करण्यासाठी आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि दिल्लीतील प्रशासन आग्रही आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांशी मिळालेल्या पर्यायांनुसार कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सामाजिकत कामांमध्ये लॉकडाऊन शिथिल करणार असल्याचा मनसुबा व्यक्त केला. दिल्लीतील नागरिकांकडून लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. 

केरळमध्ये सर्वाधिक आर्थिक फायदा हा पर्यटन क्षेत्रातून येतो. परिणामी या राज्याकडून स्थानिक रेल्वे सेवा, प्रादेशिक विमानसेवा, हॉटेल, उपहारगृहं पुन्हा सुरु करण्याचा आग्रह करण्यात येत आहे. भारतातील कोरोनाचे पहिले तीन रुग्ण केरळमध्येच आढळले होते, ही बाब लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं. सध्याच्या घडीला देशात कोरोनामुळं तणावाची परिस्थिती असताना केरळमध्ये मात्र कोरोनावर काही अंशी नियंत्रण मिळवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आल्याचं कळत आहे. 

वाचा : पोलिसांच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला खिलाडी कुमार 

 

कर्नाटकातही उपहारगृह, हॉटेल, व्यायामशाळा यासोबत काही सार्वजनिक ठिकाणी चालणारं कामकाजही पुन्हा सुरु करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी ९५९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार येथे १५१८ जण क्वारंटाईन असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळं आता कर्नाटकमध्ये लॉकडाऊन किती शिथिल करण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

तामिळनाडूतूनही असाच सूर आळवण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता इतर सर्वच ठिकाणी चालणाऱ्या आर्थिक व्यवसाहारांना पुन्हा सुरु करण्यासाठीचा सूर येथे आळवला जात आहे. पण, गेल्या काही दिवसांत तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता इथे लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत नेमका कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान, काही राज्यांनी कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश संपादन केलं. तर, बहुतांश ठिकाणी मात्र ल़ॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला गेला. त्यामुळं आता चौथ्या टप्प्यात लॉकडाऊवन शिथिल करण्यासाठी आग्रही असणारी ही राज्य कितपट यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.