Indian Railway Viral Video: भारतीय रेल्वेच्या (Indian Train) जनरल डब्ब्यात प्रवास करण्यासाठी करावी लागणारी कसरत ही या डब्याने कधी ना कधी प्रवास केलेल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. खास करुन एकाद्या सणवाराला किंवा मोठ्या सुट्ट्याच्या कालावधीमध्ये या ट्रेन्समध्ये पाऊल ठेवायला जागा नसते. अशावेळेस गर्दीमधून वाट काढणं हे एखाद्या युद्धभूमीवर उतरुन लढाई लढण्याइतकेच जिकरीचं होऊन जातं. असाच काहीसा प्रकार देवगिरी एक्सप्रेसमध्ये घडला. देवगिरी एक्सप्रेसमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनमध्ये प्रवाशांची एवढी गर्दी दिसत आहे की पाऊल ठेवायलाही जागा नाही. केवळ सीटवर नाही तर अनेकजण दोन सीटमधील पॅसेज आणि कॉमन पॅसेजमध्येही बसल्याचं दिसत आहे. गर्दी एवढी आहे की प्रवाशांना टॉयलेटला जाण्यासाठीही एखादं टास्क दिल्याप्रमाणे कसरत करावी लागत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण गर्दीमधून रस्ता काढता येत नसल्याने चक्क कॉमन पॅसेजच्या दोन्ही बाजूला असलेल्या सीटवर पावलं ठेवत जाताना दिसत आहे. फारच कसरत करुन या तरुणाला या गर्दीतून जावं लागत आहे. हा तरुण अगदी जीवावर उदार होऊन जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सीटवरील पाऊल सरकलं तर तो सरळ खाली बसलेल्या प्रवाशांवर पडला असता. त्यामुळे त्यालाही मार लागला असता आणि खालचे प्रवाशीही जखमी झाले असते. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला 5 हजारांच्या आसपास शेअर्स आहेत. तर व्हिडीओ 1.6 मिलियनहून अधिकव वेळा पाहिला गेला आहे. अभिजित दिपके नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
"माझ्या एका चुलत भावाने हा व्हिडीओ पाठवला जो ट्रेनने प्रवास करत होता. व्हिडीओत त्याचा मित्र टॉयलेटला जाण्यासाठी गर्दीतून रस्ता काढता दिसत आहे," अशी कॅफ्शन अभिजित यांनी या व्हिडीओला दिली आहे. तसेच त्यांनी उपहासात्मकरित्या भारतीय रेल्वेला टॅग करुन, "भारतीय रेल्वेचे आभार मानतो की त्यांनी रेल्वे प्रवास एक साहसी खेळ करुन दाखवला आहे," असं म्हटलं आहे.
Got this video from my cousin who was travelling in Railway.
Here is his friend trying to make his way to the toilet. @RailMinIndia, thank you for transforming train journey into an adventure sport. pic.twitter.com/3fuHdXWS2A
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) June 18, 2023
अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत ही अशी दृश्य अनेकदा रेल्वेत दिसून येतात असं म्हटलं आहे. भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनावर अनेकांनी टीका केली आहे. अनेकदा आपल्याला असे अनुभव आल्याचं बऱ्याच जणांनी म्हटलं आहे. तर काहींनी वयस्कर लोकांनी तसेच लहान मुलांनी अशावेळेस काय करावं असा प्रश्न विचारला आहे. अशाच पद्धतीने भारतीय रेल्वेचं कामकाज चालतं असा टोला काहींनी लागवला आहे. हा सारा प्रकारच फारच संतापजनक आणि चीड आणणार असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.