मुंबई : मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही त्यात आता सरकारला तिसऱ्या लाटेबद्दल चिंता वाटू लागली आहे. तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरणार असून देश त्याला सामोरे जाण्यासाठी किती तयार असेल, हा मोठा प्रश्न आहे. त्याच वेळी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं देखील आव्हानात्मक असणार आहे.
सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत म्हटलं की, जगभरातील शास्त्रज्ञांना याची चिंता आहे आणि या लाटेला रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लस यावर सध्या तरी प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होणं महत्त्वाचं आहे.
लस उत्पादनाची सध्याची मर्यादा वाढली की जगातील जास्तीत जास्त लोकांना लस मिळू शकेल. जगात अनेक लस आल्या आहेत. त्यांचे उत्पादन वेगाने करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यासह, आणखी बऱ्याच लस देखील अंतिम टप्प्यात आहेत. या सर्व लस संपूर्ण जगाच्या गरजा भागविण्यास सक्षम असतील.
कोणत्याही देशातील 15-20 टक्के लोकसंख्या दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग स्थिर करते. ऑक्टोबरपर्यंत देशात लस उत्पादनाच्या सद्य स्थिती आणि भविष्यातील तयारीच्या आधारे एसबीआयचा दावा आहे की देशात सुमारे 105 कोटी डोस उपलब्ध होतील. यामुळे भारतातील 15 टक्के लोकांना दोन्ही डोस आणि 55 टक्के लोकांना पहिला डोस मिळू शकेल. याचा अर्थ असा की सुमारे 70 टक्के लोकसंख्या सुरक्षित होईल.
इतर अनेक तज्ञांचे मत आहे की दोन-तीन महिन्यांत किमान लोकसंख्येच्या 30 टक्के लोकांना दोन्ही डोस मिळेल. पुढील 4 महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत जाईल. त्यानंतर तिसरी लाट येण्यासाठी दोन-तीन महिने लागतील. अशा प्रकारे, तिसरी लाट ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येईल.
डॉ. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरपर्यंत भारतातील मोठ्या लोकसंख्येला लस दिली गेली असेल. ते पुढे म्हणाले की, देशात कोवॅक्सिन आणि कोविकिशल्डचे वाढते उत्पादन आणि स्पुतनिक-व्हीचे उत्पादन व्यतिरिक्त जेनोव्हाच्या आरएनए आणि कॅडिलाच्या डीएनएवर आधारित लसदेखील बाजारात आल्या असतील.
या दोन्ही लसांच्या तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. त्यांना जून-जुलैमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली जाऊ शकते. डॉ. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही लसी खऱ्या अर्थाने बदल आणतील. कारण त्या थोड्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तयार केल्या जाऊ शकतात.