नवी दिल्ली: दिल्ली शहरात कधी काय घडेल, याचा नेम असतो. येथील हवामान किंवा राजकारण म्हणा प्रत्येक गोष्ट कायम चर्चेचा विषय असतो. दिल्लीतील अशाच एका घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिल्लीतील चोरट्यांनी चक्क राष्ट्रपती भवनाला इंगा दाखवला आहे. राष्ट्रपती भवनाच्या जोर बाग परिसरातील पाण्याचे पाईप्स खराब झाले होते. हे पाईप्स बदलून नवीन पाईप टाकले जाणार होते. त्यासाठी कंत्राटदारांने राष्ट्रपती भवनाच्या २३ आणि २४ क्रमांकाच्या गेटबाहेर २० ते २२ नवीन पाईप आणून ठेवले होते.
राष्ट्रपती भवनाचा परिसर असल्यामुळे कंत्राटदाराला या पाईपच्या सुरक्षेची काळजी नव्हती. मात्र, चोरट्यांनी हा अंदाज फोल ठरवला. चोरट्यांनी रातोरात हे सर्व पाईप लंपास केले.
ही घटना लक्षात आल्यानंतर कंत्राटदाराकडून चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यावेळी राष्ट्रपीत भवनाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये एक व्यक्ती कारमधून पाईप ठेवलेल्या ठिकाणी आल्याचे दिसत आहे. त्यापाठोपाठ एक कंटेनरही येथे आला. यानंतर हे सर्व पाईप कंटेनरमध्ये भरून चोरटे तेथून पसार झाल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.
रेल्वे स्थानकांवर पुन्हा मिळणार कुल्हडमधील चहा
पोलिसांनी याप्रकरणी चारजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर हे पाईप मेरठमध्ये विकण्यात आल्याचे समोर आले. या सर्वांची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे दिल्लीत सामान्य माणूसच काय राष्ट्रपती भवनही सुरक्षित नसल्याचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.