या पाच कारणांमुळे अंडे झाले महाग

ट्रेडर्स आणि जाणकांराच्या माहितीनुसार ही किंमत ९ ते १० रुपये प्रति अंड्यापर्यंत पोहोचू शकते.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 20, 2017, 06:45 PM IST
या पाच कारणांमुळे अंडे झाले महाग  title=

मुंबई : हळूहळू वाढत चाललेल्या थंडीमध्ये अंड्याची किंमतही वाढत चालल्याचे दिसून येत आहे. पाच रुपयांना मिळणारं अंड सात ते सव्वा सात रुपयाला मिळू लागले आहे. 

९ ते १० रुपये अंड ?

ट्रेडर्स आणि जाणकांराच्या माहितीनुसार ही किंमत ९ ते १० रुपये प्रति अंड्यापर्यंत पोहोचू शकते. ही कच्च्या अंड्याची किंमत असून उबाळलेली अंडी तर यापेक्षा २-३ रुपयांनी महाग असतात. 

किंमत अजून वाढणार

भाज्यांचे दर आकाशाला भिडले असताना अंड्याचे भाव ही वाढल्याने सर्वसामान्यांची गोची झाली आहे. कोंबड्यांच्या तुलनेत अंड्यांची किंमत जलद दतीने वाढल्याचे ट्रेडर्स सांगत आहेत. एक्सपर्ट आणि ट्रेडर्सच्या मते अंड्यांची किंमत वाढण्याची पाच प्रमुख कारणे आहेत. 

मागणी वाढली

थंडीचे प्रमाण वाढताना अंड्याची किंमतही वाढत आहे. वाढत्या थंडीमध्ये मांसाहार खाणाऱ्यांसोबतच शाकाहारीही अंड्यांची मागणी करु लागले आहेत. नॅशनल एग कॉर्डिनेशन कमिटीच्या माहितीनुसार अंड्याची मागणी १५ टक्क्यांनी वाढली आहे. तर मार्केटमधील सुत्रांच्यानुसार ही मागणी २५ टक्क्यांनी वाढली आहे. 

भाज्यांच्या वाढत्या किंमती

हिरव्या भाज्यांच्या किंमती ६० ते १०० रुपयांनी वाढल्या. महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा वर जाऊ शकतो. त्यामूळे याचा परिणाम भाज्या तसेच अंड्यांच्या किंमतीवरही झाला आहे. 

नोटबंदीचा परिणाम

अंड्याच्या वाढत्या किंमतीत नोटबंदीचेही प्रमुख कारण मानले जात आहे. नोटबंदीमुळे अंडी आणि कोंबड्यांचे उत्पादन खूप कमी झाले असे सांगण्यात येत आहे.

कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दुष्काळ

कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये दुष्काळामूळे मक्क्याचे उत्पादन वाया गेले. हे उत्पादन कोंबड्यांचा मुख्य आहार असते. मक्याची किंमत प्रति क्विंटल १९०० रुपये एवढ्या दरावर पोहोचली. त्यामूळे पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना याचा जोरदार फटका बसला. उत्पादनावर याचा थेट परिणाम झाला आहे. 

कमी वजनाच्या कोंबड्या 

कोंबड्यांना पर्यायी खाणे न मिळाल्याने आणि मागणी वाढतच असल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामूळे शेतकरी आणि ट्रेडर्सनी कमी वजनाच्या कोंबड्या विकण्यास सुरुवात केली आहे. नेहमीच्या मागणी आणि पुरवठ्यावर याचा परिणाम अंड्यांच्या किंमती वाढून झाला.