उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सहारनपूर येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आशीर्वाद घेण्याच्या बहाण्याने तिघेजण एका तृतीयपंथीयाच्या घरी घुसले. यानंतर त्यांना घरात घुसून चोरी केली. सीसीटीव्हीत ही सगळा प्रकार कैद झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून चौकशी केली जात आहे.
महुआ असं या तृतीयपंथीयाचं नाव आहे. कुतुबशेर क्षेत्रात उर्मिला हॉस्टिपलजवळ त्यांचं घर आहे. महुआने सांगितलं आहे की, एक व्यक्ती त्यांच्या घऱी मिठाईचा डबा घेऊन आला होता. आमच्याकडे मुलगा झाला असून त्याची मिठाई देण्यासाठी आलो आहोत असं सांगत होता. यानंतर आम्ही त्यांना पाणी पाजलं. नंतर आशीर्वाद दिला.
पुढे तिने सांगितलं की, "यानंतर तो तरुण बाहेर गेला होता. पण जवळपास 10 ते 15 मिनिटांनी तीन तरुण आले. तिघांकडे गावठी पिस्तूल होती. त्यांनी घराच्या आत मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कपाटात ठेवलेले दीड लाख रुपये आणि सोन्याची चेन चोरुन नेली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी आमची पोलिसांना विनंती आहे".
वरिष्ठ पोलीस अधीक्षक विपीन तारा यांनी सांगितलं आहे की, कुतुबशेर क्षेत्रातील तृतीयपंथीयाच्या घरी शस्त्रधारी लोकांनी चोरी केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही चौघांपैकी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. तपासात तृतीयपंथीयांच्याच दोन गटात वाद असल्याचं समोर आलं आहे. पोलीस सध्या तपास करत असून जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करणार आहेत.