जयपूर : काळवीट शिकार प्रकरणात बिष्णोई समाजाच्यावतीने सलमान खान विरुद्ध ज्या वकिलाने खटला लढला होता. त्या वकिलाने पोलीस कॉन्स्टेबलला चिरडल्याची घटना समोर आली आहे. जोधपूरमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी वकिलाला अटक केली आहे.
रमेश सरन असं गाडीखाली चिरडल्या गेलेल्या कॉन्स्टेबलचं नाव आहे. कुडी भगतसनी पोलीस स्टेशनच्या परिसरात नाका क्रमांक 3 येथे रमेश सरन हे डिव्हायडरजवळ उभे होते. समोर एक बॅरिगेट होता, त्याचवेळी तब्बल 120 च्या वेगाने एक कार आली. बॅरिगेटला धडक देत रमेश यांना खाली पाडत कार त्यांच्या अंगावरून गेली. यावेळी घटनेच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी जखमी रमेशला एम्स रूग्णालयात नेले.
रमेशच्या डोक्याला, पाठीचा कणा यासह अनेक ठिकाणी दुखापती झाल्या होत्या. डॉक्टरांनी रात्री खूप प्रयत्न केले, पण रमेशला वाचवता आलं नाही. कार चालवत असलेले वकील महिपाल बिश्नोई हे काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात बिष्णोई समाजाच्या वतीने वकील होते. सध्या आरोपी वकील महिपाल बिश्नोई यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गाडी चालवताना त्यांनी मद्य घेतल्याची माहिती आहे.
सलमानचं हिट अँड रन प्रकरण-
दरम्यान, मुंबईच्या फुटपाथवर झोपलेल्या गरीब मजुरांना भरधाव गाडीखाली चिरडल्याच्या आरोप सलमानवर लावण्यात आला होता. मात्र सलमानला दोषी ठरवण्या इतपत सबळ पुरावा सरकार पक्षाकडं नसल्याचं स्पष्ट करत, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केलं होतं.