ZEE DIGITAL SPECIAL - पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा 'तिसरा डोळा' सज्ज

ड्रोनचा वापर करून भारताला त्रास देण्याचे पाकिस्तानचे मनसुबे ठेचण्यास डीआरडीओ सज्ज 

Updated: Jul 2, 2021, 11:03 PM IST
ZEE DIGITAL SPECIAL - पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा 'तिसरा डोळा' सज्ज title=

अमित भिडे, झी 24 तास, मुंबई : पाकिस्तानच्या ड्रोन (Drone) हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा तिसरा डोळा सज्ज झालाय. डीआरडीओने (DRDO) विकसीत केलेली अँटी ड्रोन सिस्टीम (Anti Drone System) लवकरच कार्यान्वित केली जाण्याची सूत्रांची माहिती आहे. जम्मू विमानतळावर असलेल्या एअरफोर्स (Air Force) स्टेशनवर 27 जूनला दहशतवाद्यांनी ड्रोन हल्ला केल्यामुळे भारतीय लष्कर (Indian Army) सतर्क झालंय. त्यानंतर सातत्याने जम्मू काश्मीरमध्ये मिलिटरी स्टेशन्सवर ड्रोन्स दिसून आली आहेत. जम्मूजवळ रतनुचक- कालुचक इथल्या लष्करी तळावरही ड्रोनच्या हालचाली दिसल्या. 

श्रीनगर विमानतळ परिसरातही ड्रोन दिसला. आज जम्मूजवळ आर्निया सेक्टरमध्ये भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पहाटे 4 वाजता पाकिस्तानी सर्व्हिलिअन्स ड्रोन घिरट्या घालताना दिसलं. बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केल्यावर हे ड्रोन माघारी परतलं. तर इस्लामाबादमध्येही भारतीय उच्चायुक्तालयावर पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालत होतं. एकूणच दहशतवाद्यांनी ड्रोनमुळे भारतीय फौजांची कटकट वाढवलीय

ड्रोनचा वापर कशासाठी?

ड्रोन किंवा क्वाड्रापॉडचा वापर हेरगिरीसाठी प्रामुख्याने होते. दहशतवादी गट लष्कर ए तोयबाने जम्मू काश्मिरात याचा वारंवार वापर केल्याचं दिसून आलंय. लष्करी तळांची हेरगिरी, आर्म्स ड्रॉप, अंमली पदार्थांची तस्करी यांसाठी लष्कर ए तोयबाने जम्मू काश्मिरात ड्रोन वापरले आहेत. त्याशिवाय भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे असलेले पाकिस्तान रेंजर्स आणि एलओसीवर असलेलं पाकिस्तानी लष्कर सातत्याने ड्रोनचा वापर भारतीय हद्दीवर हेरगिरीसाठी करत असतं. भारतीय लष्कराने याआधी पाकिस्तानचे ड्रोन पाडलेतही. 

पाकिस्तानी ड्रोन्सवर गोळीबाराच्या सातत्याने वार्ता समोर येतात. मात्र जम्मूत 27 जूनला झालेला हल्ला हा वेगळा समजला जातो. प्रथमच ड्रोनच्या मदतीने लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. हा हल्ला लष्कर ए तोयबाने केल्याचा संशय जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग यांनी व्यक्त केलाय. 

डीआरडीओ ठेचणार पाकिस्तानी मनसुबे

ड्रोनचा वापर करून भारताला त्रास देण्याचे पाकिस्तानचे मनसुबे ठेचण्यास डीआरडीओ सज्ज झालंय. डीआरडीओची अँटी ड्रोन सिस्टीम यासाठी सज्ज झालीय. लवकरच ही सिस्टीम कार्यान्वित होईल अशी सूत्रांची माहिती आहे. डी-4 असं या सिस्टीमचं नाव असून महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर आणि संवेदनशील ठिकाणी ही सिस्टीम लावली जाईल. कार्यान्वित झाल्यावर वायुदल याची नोडल एजन्सी असेल. 

कशी काम करते अँटी ड्रोन सिस्टीम?

डीआरडीओची अँटी ड्रोन सिस्टीम भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीने तयार होत आहे. हवेतली अज्ञात टार्गेट शोधणे आणि मारणे यासाठी ही सिस्टीम वापरली जाईल. इंटरसेप्ट, डिटेक्ट अँड डिस्ट्रॉय या त्रिसुत्रीवर ही यंत्रणा काम करेल. या सिस्टीममध्ये लेझर बेस किल मेकॅनिझम बसवण्यात आलंय. त्यामुळे हवेतल्या हवेत टार्गेट नष्ट करण्यासाठी त्याचा वापर होईल. 360 अंशांच्या परिघात ही यंत्रणा टार्गेट शोधेल. जवळपास 3 किमी परिघातल्या युएव्ही, ड्रोन्स जॅम करण्याची या यंत्रणेची क्षमता आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

तसंच लेझरच्या सहाय्याने 1 ते अडीच किमी अंतरावरील लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता आहे. इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड सेन्सर्सच्या सहाय्याने 2 किमी परिघातली ड्रोन्स शोधण्याची क्षमता या यंत्रणेची आहे. तर 3 किमी परिघातली रेडिओ फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन शोधण्याची या सिस्टीमची क्षमता आहे. ही रेडिओ फ्रिक्वेन्सी शोधून सिग्नल्स जॅम करण्याची त्याची क्षमता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. केवळ जॅमिंग आणि जॅम करून ड्रोन उध्वस्त करणे अशा दोन पातळ्यांवर ही यंत्रणा काम करेल. त्याला सॉफ्ट किल आणि हार्ड किल असं म्हटलं जातं.

यंत्रणेचा याआधी वापर कधी?

डीआरडीओच्या या यंत्रणेचा वापर 2020 आणि 2021 च्या प्रजासत्ताक दिन परेडवेळी झालाय. परेडच्या ठिकाणी अज्ञात ड्रोन्सना मज्जाव करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. तसंच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद दौऱ्यावेळीही या यंत्रणेचा वापर केला गेला. 

भारतीय लष्करासाठी ही यंत्रणा फार मोलाची कामगिरी बजावणार आहे. भारतीय तंत्रज्ञान आणि भारतातच निर्मिती होत असल्याने खर्चाच्या दृष्टीनेही ही यंत्रणा किफायतशीर ठरणार आहे. ही यंत्रणा लागू केल्यावर दहशतवाद्यांचे ना'पाक' इरादे ठेचले जातील यात शंकाच नाही.