दशतवादी हाफिज सईदच्या मालमत्ता ईडीकडून जप्त, टेरर फंडिंगसाठी मालमत्तांचा गैरवापर?

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या आर्थिक मुसक्या आवळल्या

Updated: Aug 12, 2022, 09:10 PM IST
दशतवादी हाफिज सईदच्या मालमत्ता ईडीकडून जप्त, टेरर फंडिंगसाठी मालमत्तांचा गैरवापर? title=

Hafiz Saeed ED : पाकिस्तानात (Pakistan) राहून घातपाती कारवाया करणारा कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या आर्थिक मुसक्या आवळण्यात आल्यात. फेब्रुवारी 2022  पर्यंत ईडीनं अनेक दहशतवाद्यांच्या (Terrorist) मालमत्ता जप्त केल्या. तब्बल 1 हजार 249 कोटी रुपयांच्या मालमत्ता ईडीनं (ED) जप्त केल्या. त्यामध्ये लष्कर-ए-तय्यबा (lashkar-e-taiba) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) 25 मालमत्तांवरही ईडीनं टांच आणली आहे.

हाफिज सईदच्या मालमत्ता जप्त
दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये या सगळ्या मालमत्ता होत्या. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये निवासी फ्लॅट, दुकानं, बँक खात्यांचा समावेश आहे. या 25 मालमत्तांची किंमत सुमारे 9 कोटी रुपये आहे. हाफिज सईदचा हस्तक सलमान याच्या नावावर या मालमत्ता होत्या. 

ईडीनं हाफिज सईदविरोधात 24 ऑगस्ट 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सलमान विरोधात एनआयएनं गुन्हा नोंदवला. या मालमत्तांमधून मिळालेला पैसा टेरर फंडिंगसाठी वापरला जात होता, असा ईडीचा आरोप आहे. 

उत्तर प्रदेश आणि हरयाणामध्ये दहशतवादी नेटवर्क वाढवण्यासाठी सलमान कार्यरत होता, अशी माहिती तपासात पुढं आलीय.  गोरगरिबांच्या मुलींची लग्नं लावून देऊन, त्याच्या घरातल्या तरुण मुलांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी सलमानवर होती. आता हाफिज सईदच्या मालमत्ता जप्त झाल्यानं दहशतवाद्यांची चांगलीच आर्थिक नाकाबंदी झालीय.