Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे सरकार येताना दिसत आहे. असे झाल्यास कर्नाटकनंतर आणि आणखी एक दक्षिणी राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते. या सर्व निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रदेश अध्यक्ष ए.रेवंत रेड्डी यांचे नाव समोर येत आहे. रेवंत रेड्डी कोण आहेत? त्यांचा राजकीय दबदबा किती आहे? ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार का मानले जात आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सध्या रेवंत रेड्डी यांच्याकडे तेलंगणा प्रदेश काँग्रेस युनिटचे अध्यक्षपद आहे. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी अविभाजित आंध्र प्रदेशातील कोंडारेड्डी पल्ली, नगरकुर्नूल येथे झाला. रेवंत यांच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिंह रेड्डी आणि आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा आहे. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाच्या ए.व्ही. कॉलेजमधून शिक्षण घेतले. ते कला शाखेत पदवीधर आहेत.
7 मे 1992 रोजी रेवंतने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची अनुमुला गीताशी लग्न केले. मात्र, सुरुवातीला करिअरच्या निवडीमुळे कुटुंबातील सदस्यांकडून जोरदार विरोध झाला. पण नंतर घरच्यांनी होकार दिला. त्यांना न्यामायशा नावाची मुलगी आहे.
लग्नानंतर काँग्रेस खासदार रेवंत यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ज्याची कहाणीही खूप रंजक आहे. विद्यार्थीदशेतच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आरएसएसच्या विद्यार्थी संघटनेसाठी काम करायचे. 2006 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि मिडझिल मंडळातून जिल्हा परिषद प्रादेशिक समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. यानंतर 2007 मध्ये ते आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सदस्य झाले. या कार्यकाळात ते तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाचा एक भाग बनले.
2009 मध्ये, रेवंत यांनी टीडीपीच्या तिकिटावर आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि 6 हजार 989 मतांनी विजयी झाले. कोडंगल मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या रेवंत यांनी पराक्रम केला. ते पाच वेळा काँग्रेसचे आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव करून पहिल्यांदाच आमदार झाले.
तेलंगणाच्या सत्ता स्थापनेपूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, रेवंत पुन्हा एकदा कोडंगल मतदारसंघातून टीडीपीचे उमेदवार बनले. पुन्हा एकदा त्यांनी यावेळी टीआरएसचे उमेदवार असलेल्या गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी 14 हजार 614 मतांनी विजय मिळवला होता. यानंतर टीडीपीने रेवंत यांना तेलंगणा विधानसभेचे नेते बनवले. तथापि, 25 ऑक्टोबर 2017 रोजी टीडीपीने रेवंत यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकले. शेवटी, 31 ऑक्टोबर 2017 रोजी, रेवंत काँग्रेसचे सदस्य झाले.
20 सप्टेंबर 2018 रोजी, त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (TPCC) च्या तीन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 च्या तेलंगणा विधानसभेत, रेवंत यांनी कोडंगल मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवली. यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या रेवंत यांना बीआरएसच्या पटनम नरेंद्र रेड्डी यांच्याकडून पहिला पराभव पत्करावा लागला.
विधानसभा पराभवानंतर रेवंत यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले. 2019 च्या निवडणुकीत जिंकलेल्या तेलंगणातील काँग्रेसच्या तीन लोकसभा खासदारांपैकी रेवंत यांचा समावेश आहे. मलकाजगिरी जागेवरील काँग्रेसच्या उमेदवाराने टीआरएसच्या एम राजशेखर रेड्डी यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
रेवंत यांना जून 2021 मध्ये मोठी जबाबदारी मिळाली. कॉंग्रेसने त्यांना तेलंगणा राज्य युनिटचे अध्यक्ष केले. या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढवली. सिद्धीपेट जिल्ह्यातील गजवेल विधानसभा जागेवर ही लढत आहे. आता ते कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत.