मुंबई : दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायदे (New Farm laws) केले. याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान, आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आता शेतकरी संघटनांकडून आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 6 फेब्रुवारीला शेतकरी संघटना देशव्यापी चक्का जाम (Chakka Jam) करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी ही घोषणा केली आहे. 6 फेब्रुवारीला 12 ते 3 या वेळेत सर्व रस्ते अडवले जाणार आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनाची आक्रमक भूमिका घेतली आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे दडपशाहीच्या निषेधार्थ 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा देशभर चक्का जाम असणार आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी म्हटले आहे.
दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने चारही आंदोलन स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. भाजपचे कार्यकर्ते स्थानिक व्यापारी असल्याचे भासवत आंदोलकांवर पोलिसांच्या मदतीने दगडफेक करत आहेत. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे, असा गंभीर आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.
There's no problem if Opposition is coming to support us but it should not be politicised. We can't do anything if leaders come. The traffic movement has not been blocked by farmers, it is because of the police barricading: BKU leader Rakesh Tikait pic.twitter.com/jejdg3smqI
— ANI (@ANI) February 2, 2021
शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठाही खंडित केला जात आहे. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे, असे सांगत आम्ही धिक्कार केला आहे, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभेने दिली आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी किसान सभेच्या सर्व शाखा सक्रियपणे नियोजन करत आहेत. समविचारी संघटनांना सोबत घेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी व श्रमिकांना या आंदोलनात सक्रिय भागीदारी करावी, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभेने केले आहे.