Twin Tower Demolition: उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) इथं अनधिकृतपणे उभे राहिलेले ट्वीन्स टॉवर (Supertech Twin Towers) अखेर पाडण्यात आले. अवघ्या 9 सेकंदात देशातील सर्वात उंच उमारत जमीनदोस्त झाली आहे. ही इमारत पाडण्यासाठी 3 हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.
हे ट्वीन टॉवर्स पाडण्याचं काम एडिफाय इंजिनीअरिंगला (Edifice Engineering) देण्यात आलं होतं. ही इमारत पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती. या टीमचं नेतृत्व करत होते एडिफाय इंजिनिअरिंगचे अधिकारी चेतन दत्ता (Chetan Datta). नियोजनबद्धरित्या करण्यात आलेलं हे पाडकाम 100 टक्के यशस्वी झाल्याचं चेतन दत्ता यांनी सांगितलं.
या स्फोट घडवून आणण्यासाठी 3 हजार 700 किलोग्रामहून अधिक स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. पण जशी ट्विन टॉवर जमीनदोस्त झाला त्यावेळी चेतन दत्ता आणि त्याच्या टीमच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू आले. कामगिरी यशस्वी झाल्याचे हे आनंदाश्रू होते.
चेतन दत्ता यांनी काय दिली प्रतिक्रिया
ट्विन टॉवर जमीनदोस्त झाल्यानंतर चेतन दत्ता आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाले, यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. ही कामगिरी 100 टक्के सफल झाली होती. टॉवर पाडण्यासाठी केवळ 9 सेकंदाचा कालावधी लागला. आपल्या टीममध्ये एडिफायचे 25 इंजिनिअर आणि 7 परदेशी तज्ज्ञ असल्याची माहिती चेतन दत्ता यांनी दिली.
टॉवर जमीनदोस्त करण्यासाठी जसा सायरन वाजला तसं सगळीकडे एकच शांतता पसरली. कामगिरी यशस्वी होईल की नाही, कोणतं नुकसान तर होणार नाही ना अशी भीती त्यांना सतावत होती. पण कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही, सर्व नियोजन केल्यानुसार घडल्याचं चेतन दत्ता यांनी सांगितलं.
बटन दाबलं आणि घटनास्थळी धाव घेतली
चेतन दत्ता यांनी सांगितलं, स्फोटासाठी बटन दाबलं आणि समोर एक नजर टाकली तेव्हा संपूर्ण टॉवर जमीनदोस्त झाले होते. त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेत इतर सोसायटींना काही नुकसान झालं नाही ना याची पाहणी करण्यासाठी पोहोचलो. सुदैवाने आसपासच्या इमारतींचं कोणतंच नुकसान झालं नव्हतं.
अशी घेतली होती खबरदारी
एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुमारे 5 हजार लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले होतं. नोएडा प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, इमारत पाडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात धुळीचा सामना करण्यासाठी 100 पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले होते. 15 अँटी स्मॉग गन, 6 मेकॅनिकल स्वीपिंग मशीन, सुमारे 200 सफाई कामगार आणि 20 ट्रॅक्टर ट्रॉली लावण्यात आल्या होत्या. याशिवाय 100 हून अधिक अग्निशमन बंबही सज्ज ठेवण्यात आले होते.