जिद्द असावी तर अशी ! पती IPS आणि आता पत्नी बनली IAS; UPSC परीक्षेत देशात तिसरी

देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात, परंतु फार कमी विद्यार्थी पास होतात.

Updated: Oct 10, 2021, 05:52 PM IST
जिद्द असावी तर अशी ! पती IPS आणि आता पत्नी बनली IAS; UPSC परीक्षेत देशात तिसरी title=

मुंबई : देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात, परंतु फार कमी विद्यार्थी पास होतात आणि भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी बनतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाने गेल्या महिन्यात CSE 2020 च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला होता, ज्यात दिल्लीची अंकिता जैन देखील यशस्वी झाली आणि अखिल भारतात तिसरा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी झाली.

नोकरी सोडून यूपीएससीची तयारी

अंकिता जैन मूळची दिल्लीची असून ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने 12 वी नंतर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पदवी प्राप्त केली. यानंतर तिला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली, पण काही काळानंतर तिने नोकरी सोडली आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

नोकरी सोडल्यानंतर अंकिता जैनने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप मेहनत घेतली, पण पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये ती आयएएस बनण्यात अयशस्वी झाली. असे असूनही तिने हार मानली नाही आणि चौथ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करून नागरी सेवेचे स्वप्न पूर्ण केले.

चौथ्या प्रयत्नात तिसरा क्रमांक

अंकिता जैनने 2017 मध्ये UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. तिला पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, परंतु तिने चौथ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. तिची रँक चांगली नव्हती. यामुळे तिची IAS साठी निवड होऊ शकली नाही. ती भारतीय लेखा सेवेत रुजू झाली. तिने यूपीएससीची तयारीही चालू ठेवली, परंतु ती तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करू शकली नाही. शेवटी, चौथ्या प्रयत्नात तिने आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

अंकिता जैन यांचे पती आयपीएस अधिकारी

अंकिता जैन यांची कौटुंबिक पार्श्वभूमी नागरी सेवेची आहे आणि त्यांचे पती अभिनव त्यागी आयपीएस अधिकारी आहेत. याशिवाय विशेष गोष्ट अशी की यावेळी अंकिताची बहीण वैशाली जैन हिनेही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखिल भारतात 21 वी रँक मिळवून आयएएस अधिकारी बनली.