गाजियाबादमध्ये पिटबूलने 15 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. शेजाऱ्याच्या पिटबूलने केलेल्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिटबूलच्या हल्ल्यानंतर मुलगा मदतीसाठी आरडाओरड करत असताना तिथे उपस्थित लोक फक्त पाहत उभे होते. अखेर भटके कुत्रे मुलाच्या मदतीसाठी धावले आणि त्याची सुटका झाली.
अलताफ असं हल्ला झालेल्या मुलाचं नाव आहे. पिटबूलने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर तो खाली कोसळला होता. अलताफ आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना यावेळी एक माणूस आणि बाई लांबून फक्त पाहत उभे होते. ते मदतीसाठी साधे जागेवरुन हाललेही नाहीत.
पिटबूलने हल्ला केल्यानंतर मुलगा त्याला लाथा घालून दूर करण्याचा प्रयत्न करत होता. यादम्यान कोणीतरी त्याच्या अंगावर पाणीही फेकलं. काही वेळाने भटके कुत्रे पिटबूलच्या अंगावर गेले. यादरम्यान मुलगा सुटका करुन सुरक्षित ठिकाणी जाण्यात यशस्वी झाला. यादरम्यान पिटबूल त्याचा पाठलाग करत होता.
Disturbing incident from #Ghaziabad involving a 15-yr old boy, Altaf who was attacked ferociously by a #Pitbull. Onlookers appeared petrified to step in, but a courageous stray dog leaped to intervene. Incidentally, Pitbulls are among the 25 breeds prohibited by the @Dept_of_AHD pic.twitter.com/ANLv14bxuv
— Adit (@IndicSocietee) April 10, 2024
व्हिडीओत दिसत आहे की, मुलगा जेव्हा जमिनीवर कोसळला होता, तेव्हा काही भटके कुत्रे पिटबूलच्या अंगावर गेले. यामुळे पिटबूल मुलाचा पिच्छा सोडून त्यांच्यावर भुंकत असतानाच त्याला सुटका करण्याची संधी मिळाली. सुटका होताच घरात जाऊन त्याने दरवाजाची कडी लावली.
हा पिटबूल ज्यांचा आहे, ते कुटुंब काही दिवसांपूर्वीच गाजियाबादमध्ये स्थायिक झालं आहे. महापालिकेने पिटबूलला आपल्या ताब्यात घेतलं आहे. शेजारी राहणारे कमलेश सिंग यांनी दावा केला आहे की, आम्ही कुटुंबाला अशाप्रकारचे श्वान ठेवण्याची परवानगी नसल्याचं समजावलं होतं.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मुलगा सध्या रुग्णालयात दाखल असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
गेल्या महिन्यात, केंद्र सरकारने पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांदरम्यान, पिट बुल टेरियर, अमेरिकन बुलडॉग, रॉटवेलर आणि मास्टिफ्ससह 23 जातीच्या क्रूर कुत्र्यांच्या विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.