पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या श्री ऑरोबिंदो यांच्या वचनांनी तुम्हालाही मिळेल यशाचा मंत्र

Sri Aurobindo Quotes : काही व्यक्ती त्यांच्या विचारांच्या बळावर इतके मोठे होतात की प्रत्येक पिढीसाठी त्यांचे शब्द प्रमाण ठरतात, मार्गदर्शन करतात. श्री ऑरोबिंदो यांची शिकवणही तशीच. कोण होते स्वामी ऑरोबिंदो? पाहा....  

सायली पाटील | Updated: Aug 15, 2023, 09:13 AM IST
पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या श्री ऑरोबिंदो यांच्या वचनांनी तुम्हालाही मिळेल यशाचा मंत्र  title=
sri aurobindo birth anniversary 10 best quotes and lessons from him

Sri Aurobindo Quotes : देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी काही व्यक्तींचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. मोदींनी उल्लेख केलेल्या या नावांमध्ये श्री ऑरोबिंदो यांच्याही नावाचा समावेश होता. ज्याच्या विचारांनी एका पिढीला बदलण्याचं आणि सन्मार्गावर आणण्याचं सामर्थ्य दाखवलं त्या गुरुदेव ऑरोबिंदो यांच्याविषयी तुम्हाला काय माहितीये? जेव्हाजेव्हा भारतात बुद्धिजीवी व्यक्तीची नावं घेतली जातात तेव्हातेव्हा श्री अरविन्द घोष म्हणजेच स्वामी ऑरोबिंदो यांचंही नाव प्रकाशझोतात येतं. अशा ऑरोबिंदो यांची जन्मतिथी 15 ऑगस्टच्या दिवशी साजरा केली जात आहे. 

बालपणापासूनच श्री अरविन्द घोष यांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहणारं व्यक्तिमत्त्वं आपलंसं केलं होतं. 15 ऑगस्ट 1872 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. शैक्षणित जीवनात कमालीचं यश संपादन करणाऱ्या ऑरोबिंदो यांनी इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या भाषांवर प्रभुत्वं मिळवलं होतं. पुढे वडिलांचा विरोध असूनही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला आणि अनेक क्रांतिकारी कार्यांमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं. “वन्दे मातरम्” आणि “कर्मयोगिन” यांसारख्या राष्ट्रवादी वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली. अशा ऑरोबिंदो यांनी त्यांच्या विचारांनी कायमच सर्वांना प्रेरित केलं. त्यांची काही वचनं आजही जीवनातील कठिणातील कठीण परिस्थितीत योग्य वाट दाखवण्याचं काम करतात. 

हेसुद्धा वाचा : स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान लाल किल्ल्यावर आले, त्या Range Rover कारचे फिचर्स पाहून थक्क व्हाल 

ऑरोबिंदो यांचे अनुकरणीय विचार... 

  • जीवनातील प्रत्येक दिवस आपल्याला नवे धडे शिकवतो, नवी समज देतो आणि आपल्या प्रगतीमध्ये योगदान देतो. 
  • आव्हानांचा सामना करणं हो कोणत्याही व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. कारण, हीच आव्हानं आपल्या यशाच्या मार्गातील मैलाचे दगड ठरतात. 
  • ज्याप्रमाणं कलाकार अद्वितीय कलाकृती सादर करतात त्याचप्रमाणं आपल्या जीवनाला योग्य आकार देण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. 
  • वर्तमानात आयुष्याचं खरं सौंदर्य असतं. त्यामुळं कायम वर्तमानात जगायला शिका. 
  • आत्मपरीक्षणामुळं समजुतदारपणा आणि अस्तित्वाचा मूळ हेतू आपल्याला उलगडतो. 
  • नात्यांमध्ये असणारे बंद आणि दृढता आणखी घटट् होणं यातूनच आयुष्याची श्रीमंती कळते. 
  • शक्यतांच्या आभाळात तुमच्या आत्म्याला गर्जना करु द्या, सर्व सीमा ओलांडू द्या...असा दृष्टीकोन श्री ऑरोबिंदो देतात.