शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सरकारकडून जमा होणार 'इतकी' रक्कम

 या कठीण प्रसंगामध्ये अन्नधान्य आणि पैशांची चिंता सतावू नये यासाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्तवाची घोषणा करण्यात आली. 

Updated: Mar 26, 2020, 02:53 PM IST
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सरकारकडून जमा होणार 'इतकी' रक्कम title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा एकंदर कहर पाहता देशातील अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. अशा परिस्थितीमध्ये तणाव आणि चिंतातूर जनतेच्या मानेवर आर्थिक संकटाचीही टांगती तलवार आहे. हीच परिस्थिती जाणत देशातील नागरिकांना या कठीण प्रसंगामध्ये अन्नधान्य आणि पैशांची चिंता सतावू नये यासाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्तवाची घोषणा करण्यात आली. 

गोरगरिब, विधवा, दिव्यांग आणि शेतकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवत निर्मला सीतारमण यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल ही मदत एप्रिल महिन्यापासून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. 
गुरुवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत सीतारमण यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून २ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. 

गोरगरिबांसाठी मोठी तरतूद 

देशभरातील गोरगरिब वर्गासाठी केंद्र सरकारकडून १ लाख ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या या निधीपैकी बहुतांश रक्कम ही विविध योजनांअंतर्गत नागरिकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. कोणत्याही गरीब व्यक्तीला भुकेलं राहू न देण्यासाठी म्हणून पुढील तीन महिन्यांपर्यंत प्रत्येक गरीबाला ५ कोटी अतिरिक्त अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार आहे. जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांचा विमा 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीसुद्धा यावेळी सीतारमण यांच्या साथीने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. ज्यामध्ये या युद्धपातळीवरील परिस्थितीमध्ये आरोग्यसेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचार्यांसाठी तब्बल ५० लाख रुपयांच्या आरोग्य विम्याची घोषणा करण्यात आली. जवळपास २० लाख कर्मचाऱ्यांचा विमा या योजनेअंतर्गत उतरवण्यात येणार आहे.