Sonia Gandhi On Women Reservation Bill: 'नारी शक्ति वंदन अधिनियम' नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकावर आज संसदेमध्ये चर्चा झाली. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सकाळी 11 च्या सुमारास चर्चेला सुरुवात केली. यानंतर काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपलं म्हणणं मांडलं. या विधेयकला आपला पाठिंबा असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं. या विधेयकाच्या माध्यमातून माझे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही सोनिया गांधींनी एक जुना संदर्भ देत म्हटलं.
केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिलांना आरक्षण मिळाल्यास त्यांचं प्रतिनिधित्व वाढेल आणि त्यांना समानता मिळेल असं म्हटलं. यानंतर सोनिया गांधी बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. 'मी या विधेयकाच्या समर्थन करते. हे विधेयक तातडीने अंमलात आणावं. राजीव गांधींनी स्थानिक स्वराज संस्थांसाठी असाच कायदा केला होता. मी या विधेयकाने फार समाधानी आहे,' असं सोनिया गांधी यांनी म्हटलं.
पुढे बोलताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी, "आपल्या महान देशाची आई ही स्त्रीच आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालताना दिसतात. स्त्री म्हणजे त्याग अशी त्यांची ओळख आहे. स्त्रीच्या धैर्याची कल्पना करता येणार नाही. महिलांमध्ये समुद्राइतकं धैर्य असतं. महिला आरक्षणाचं विधेयक सर्वात आधी काँग्रेसने संमत केलं होतं. मी या विधेयकाचं समर्थन करते. काँग्रेस पक्ष या विधेयकाचं समर्थन करत आहे. हे विधेयक तातडीने अंमलात आणलं पाहिजे. ये विधेयक अंमलात आल्यास राजीव गांधींचं स्वप्नही पूर्ण होईल, " असंही म्हटलं.
"माझ्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण आहे. पहिल्यांदा स्थानिक निवडणुकींमध्ये महिलांचा वाटा निश्चित करणारा कायद्यातील बदल माझे जीवनसाथी असलेले राजीव गांधी यांनीच केला होता. त्यांनी राज्यासभामध्ये आणलेला हा ठराव 7 मतांनी पडला. त्यानंतर नृसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारनेच ते संमत केलं. आज त्याचाच परिणाम आहे की देशातील स्थानिक संस्थांमध्ये 15 लाख निवडलेल्या महिला नेत्या आहेत. राजीव गांधींचं स्वप्न अर्धवट पूर्ण झालं आहे. हे विधेयक संमत झाल्यास ते पूर्ण होईल," असं सोनिया गांधी म्हणाल्या.
#WATCH | Women's Reservation Bill | Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi says, "This is an emotional moment of my own life as well. For the first time, Constitutional amendment to decide women's representation in local body election was brought by my life partner… pic.twitter.com/stm2Sggnor
— ANI (@ANI) September 20, 2023
सोनिया गांधींनी केलेल्या विधानावरुन भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसनेच हे विधेयक संमत केलं नाही आणि अडकवून ठेवलं असं दुबे म्हणाले. काँग्रेस आता राजकारण करत असून ते लोकशाहीचा गळा दाबत आहेत, असा आरोपही दुबेंनी केला. हे विधेयक संमत झाल्यानंतर महिलांच्या अनेक समस्या दूर होतील. मात्र या विधेयकावरुन राजकारण होईल असं वाटलं नव्हतं. विरोधकांकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती असंही दुबे म्हणाले. "हे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विधेयक आहे. काँग्रेस त्याचं श्रेय घेऊ पाहत आहे," असंही दुबे म्हणाले.